लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईत दिवाळी सणानंतर करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या पाच दिवसात ७५२ बाधितांची भर पडली आहे. मात्र बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असून ही संख्या ५८७ इतकी आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत १४३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढत असली तरी पालिकेकडे उपलब्ध खाटांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची सध्या गरज नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही प्रथमच दोन हजारंच्या खाली आली होती. ११ नोव्हेंबर रोजी सर्वात कमी म्हणजे १२४७ रुग्ण उपचार घेत होते. प्रतिबंधित क्षेत्रही दोनच शिल्लक होती. मात्र दिवाळीनंतर नियंत्रणात आलेली ही संख्या आता वाढत आहे. शंभरच्या खाली आलेली रुग्णसंखा आता परत दोनशेपर्यंत पोहचली आहे. २० नोव्हेंबरपासून ७५२ करोनाबाधितांची भर पडली असून ५८७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांतही वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या  ३५००पर्यंत पोहचली होती. दिवाळीत ही संख्या १२०० पर्यंत खाली आली होती. आता यात काहीशी वाढ झाली असून सद्यस्थितीत १४३३ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

उपचाराधिन रुग्ण वाढले तरी लगेच करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची आता गरज नाही. वेळ आल्यास २४ तासात आरोग्यसेवा पूर्ववत करता येईल. परंतू नागरिकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे.
-संजय काकडे, अतिरिक्त आयमुक्त, महापालिका