उपचाराधीन रुग्णांत सातत्याने वाढ; आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू

नवी मुंबई : शहरातील नियंत्रणात आलेली करोना परिस्थिती धोकादायक पातळी गाठत असून सर्वाधिक रुग्ण बेलापूर विभागात सापडत आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णही या विभागातच जास्त आहेत. त्यामुळे या विभागावर पालिका प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या ५६ हजारपेक्षा जास्त झाली आहे, तर आतापर्यंत ११३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात एकटय़ा बेलापूर विभागात साडेनऊ हजरांपेक्षा अधिक बाधित झाले असून आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील आठ विभागात बेलापूर विभागात उपचाराधीन रुग्ण सर्वाधिक आहेत. जानेवारी व फेब्रवारीमध्ये प्रत्येकी ४२२ उपचाराधीन रुग्ण या ठिकाणी होते. तर मार्चच्या

दहा दिवसांतच २५६ पर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या पोहचली आहे. या विभागात केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांसह सिडको, महापालिका, कोकण भवन असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेचा विविध बॅंकांची कार्यालयेही या ठिकाणी आहेत. या सर्व परिस्थितीमुळे संपर्क अधिक असल्याने करोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.

बेलापूर विभागात उपचाराधीन रुग्ण काही महिन्यांपासून सर्वाधिक आहेत. शासकीय कार्यालये व बॅंका असल्याने मोठी वर्दळ असते. तसेच सीबीडी, करावे, सीवूड्स या तीन नागरी आरोग्य केंद्रांसह बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयात तपासण्या करण्यात येत असल्याने रुग्णसंख्या अधिक आहे. पालिका ही परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी बेलापूर  

बेलापूर विभागातील उपचाराधीन रुग्ण

* एप्रिल :           ३७

* मे  :                 १३०

* जून  :               ४३६

* जुलै  :               ११७०

* ऑगस्ट  :          १५९३

* सप्टेंबर  :           १९२१

* ऑक्टोबर  :        १५२३

* नोव्हेंबर :            ९१३

* डिसेंबर :              ६६७

* जानेवारी :           ४२२

* फेब्रुवारी :             ४२२

* मार्च :                  २५६