चार केंद्रांवर ३०५जणांना लस; आणखी वाढ होणार

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणात नियोजनाअभावी पहिले तीन दिवस गोंधळ उडाल्यानंतर पालिका प्रशासनाने पुढाकार घेत आता १८ केंद्रांवर लसीकरण सुरू केल्याने ते सुरळीत झाले आहे. सोमवारी महिला केंद्रांवर दिवसभरात ३०५ जणांना लस देण्यात आली आहे.

१ मार्चपासून शासन निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणला सुरुवात झाली आहे. मात्र पहिले तीन दिवस पालिकेच्या तीन केंद्रांवरच लसीकरण करण्यात येत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता पालिका प्रशासनाने त्यांच्या लसीकरण केंद्रात वाढ केली असून खासगी रुग्णालयांतील केंद्रही वाढविण्यात आली आहेत. सोमवारी महिला दिनानिमित्त नेरुळ, वाशी, ऐरोली या तीन रुग्णालयांत व ४ नागरी आरोग्य केंद्रांत महिलांना लसीकरण सेवा देण्यात आली. आता पालिकेची ७ व खाजगी ११ अशा एकूण १८ केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत १४ नागरी आरोग्य केंद्रांवरही सेवा देण्यात येणार असून त्यामुळे एकूण ३२ केंद्रांवर लसीकरण सेवा मिळणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

नागरी आरोग्य केंद्रावर सोमवारी महिला दिनानिमित्त विशेष ४ लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच जबाबदारी स्वीकारत लसीकरण सुव्यवस्थितपणे लसीकरण पार पाडले. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एका केंद्रावर प्रत्येकी शंभर जणांना लसीकरण होणार असल्याने लसीकरणासाठी घाई व गर्दी करू नये. नोंदणी केलेल्या सर्वाना लस देण्यात येईल असे वैद्यकीय अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरात सोमवापर्यंत १८ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. आठवडाभरात एकूण ३२ केंद्रांचे नियोजन आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. सर्वाना लस देण्यात येणार आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका