नाईक समर्थक ५७ नगरसेवकांचा कोकण आयुक्तांकडे अर्ज

साडेचार वर्षांपूर्वी बहुमताचा आकडा पार करू न शकलेल्या राष्ट्रवादीने पाच अपक्ष नगरसेवकांना घेऊन तयार केलेल्या ५७ नगरसेवकांच्या गटाचा आता वेगळा गट तयार केला जाणार आहे. या गटाला कोकण विभागीय आयुक्तांनी संमती दिल्यानंतर पालिकेत सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. ही सर्व प्रक्रिया पुढील आठवडय़ात होणार आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप संभ्रमावस्था असून नगरसेवकांना प्रभाग न सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे, मात्र त्याला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता खालसा होणार आहे. देशात २०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असताना नाईक यांनी पाच अपक्षांच्या मदतीने पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवली होती. खबरदारी म्हणून सत्तेतील काही वाटा मित्रपक्ष काँग्रेसला देऊन त्यांच्या दहा नगरसेवकांची साथदेखील घेण्यात आली होती. पालिकेतील १११ नगरसेवक संख्येच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक निवडून आले होते. याच वेळी पाच शिवसेना व इतर पक्षांतील बंडखोर नगसेवक निवडून आले होते. या नगरसेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५७ नगरसेवकांची मोट बांधली होती. हे करताना त्यांनी हे संपूर्ण संख्याबळ एका वेगळ्या गटाने कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंद केले होते. त्यामुळे पाच अपक्ष नगरसेवकांना साडेचार वर्षांत हालचाल करता आली नाही. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला दिलेला पांठिबा काढला तरी राष्ट्रवादीची सत्ता कायम राहणार होती. आता या गटाचे सूत्रधार गणेश नाईक भाजपच्या उंबरठय़ावर असल्याने पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्या वेगळ्या गटापासून आता एक दुसरा गट स्थापन केला जाणार आहे. या गटाच्या पांठिब्यावर पालिकेतील सत्ताबदल शक्य होणार आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांकडे देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर समक्ष हजर राहून राष्ट्रवादीच्या एकूण ५२ नगरसेवकांपैकी ५० नगरसेवक सह्य़ा करणार आहेत. यात माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह पाच नगरसेवकांचा समावेश राहणार आहे. या सह्य़ा केल्यानंतर त्या ५७ नगरसेवकांच्या गटातून ५५ नगरसेवकांचा एक वेगळा गट पालिकेत नोंद होणार आहे. यातील राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक अशोक गावडे व त्यांची नगरसेविका मुलगी केवळ राष्ट्रवादीत राहण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर फूट

पालिकेतील सत्ताबदलासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या वेगळ्या गटातही विधानसभा निवडणुकीनंतर फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये जाणाऱ्या ५५ नगरसेवकांपैकी विधानसभा निवडणुकीनंतर बारा नगरसेवक हे शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत तर काही जण अपक्ष निवडणूक लढणे सोयीस्कर मानत आहेत. त्यानंतर केवळ सहा महिन्यांत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

गणेश नाईकांचा प्रवेशाचे केवळ सोपस्कर

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाबाबत आजही निश्चित सांगितले जात नाही. नाईक यांचा प्रवेश हा केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या तारखा अद्याप निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांना केवळ प्रभागात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नाईकांचा प्रवेश हा केवळ सोपस्कार राहिला असून तो अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह अथवा कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.