नवी मुंबई : खारघर येथील एका सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या दाम्पत्याला सीसीटीव्ही चित्रीकरण आणि समाजमाध्यमांच्या साहाय्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. राजीव आणि ममता पांडेय अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी १ एप्रिल रोजी सेक्टर १३ येथील राजलक्ष्मी या दुकानातून १० ग्रॅमच्या दागिन्यांचे २४ नग असलेली पिशवी हातचलाखीने चोरली होती.

१ एप्रिलला हे दाम्पत्य दागिने खरेदीच्या बहाण्याने राजलक्ष्मी सराफा दुकानात आहे. त्यांनी अनेक दागिने पाहिले. दुकान बंद करण्याची वेळ असल्याने कामगार गडबडीत होते. दाम्पत्याने केवळ एक नथ खरेदी केली आणि जाताना १० ग्रॅमचे २४ नग असलेली पिशवी चोरली. दुसऱ्या दिवशी दागिने तपासून शो केसमध्ये लावताना मालक पुरणसिंग राजवत यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. त्यात नथ घेणाऱ्या दाम्पत्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि ते चित्रीकरण सोनारांच्या समाजमाध्यमावरील समूहावर पोस्ट केले.

गुरुवारी रात्री हेच दाम्पत्य दुकान बंद होण्याच्या वेळी शहाजी पवार पेढीवर गेले. मात्र, पवार यांनी राजवत यांच्या दुकानातील चोरीची क्लिप पाहिली असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी समूहावर आलेले चित्रीकरण पुन्हा पाहून खात्री करून घेतली आणि खारघर पोलीस आणि पुरणसिंग यांना कळवले. पोलीस येईपर्यंत त्यांनी त्या दाम्पत्याला दुकानातून जाऊ दिले नाही. पोलिसांनी चित्रीकरण आणि पुरणसिंग यांच्याकडून खात्री करून घेत त्यांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.