दिवाळीनंतर न्यायालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता

नवी मुंबई</strong> : करोना जागतिक आरोग्य संकटानंतर जाहीर केलेल्या टाळेबंदीचा परिणाम न्यायालयांच्या कामकाजावरही झाला आहे. सध्या नवी मुंबई न्यायालयात केवळ चार खंडपीठं सुरू असून अंतिम टप्प्यातील सुनावण्या, फौजदारी खटलेच सुरू आहेत. टाळेबंदीमुळे १२ हजार न्यायालयीन खटल्यांवर परिणाम झाल्याचा अंदाज आहे. आता दिवाळीनंतर न्यायालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

करोना जागतिक आरोग्य संकटानंतर २३ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली. यात नवी मुंबईत न्यायालयाच्या कामावरही परिणाम झाला आहे. आता टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने काम करण्यास न्यायालयालाही अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ फौजदारी गुन्ह्यतील आरोपींच्या रिमांडचे कामकाज सुरू आहे.

नवी मुंबई न्यायालयात असलेल्या १६ पैकी चार खंडपीठांचे काम सुरू असून दोन खंडपीठांचे काम सकाळच्या तर दोन खंडपीठांचे काम दुपारच्या सत्रात सुरू आहे. टाळेबंदीमुळे अंदाजे १२ हजार खटल्यांच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  नवी मुंबई बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. किरण भोसले यांनी सांगितले की, दिवाळीनंतर न्यायालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी आशा आहे.

आता टप्प्याटप्प्याने सर्वच क्षेत्रांतील कामकाज सुरू होत आहे. न्यायालयांबाबत २ नोव्हेंबरला निर्णय अपेक्षित आहे. दिवाळीनंतरच न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

– अ‍ॅड. प्रसाद पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई बार असोसिएशन