विसर्जनादिवशी दिघावासीयांवर चिंतेचे ढग;१९ सप्टेंबरच्या मुदतीकडे लक्ष

दिघ्यातील सिडको भूखंडावरील चार इमारतींमधील रहिवाशांना १९ सप्टेंबपर्यंत घरे रिकामी करण्यासाठी कोर्ट रिसीव्हरने नोटिसा बजावल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर  एमआयडीसीच्या भूखंडावर बांधलेल्या इमारतींतील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यंदा गणरायाचे आगमन आणि विसर्जन दिघ्यातील घरात झाले; पण पुढच्या वर्षी गणेशाचे स्वागत कोणत्या घरात करायचे, असा सवाल दिघावासीय विचारत आहेत. गणरायाला डोक्यावरचे छप्पर वाचविण्यासाठी साकडे घातले होते; मात्र ते आता वाचेल, याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे छप्पर वाचलेच तर त्याच्या कृपेने वाचेल या आशेवर रहिवासी आहेत.

दिघा येथील रहिवासी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी खोपट येथील एकमेव तलावावर आले होते. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती.  पावसाळा संपताच बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्याचे प्रशासनाने ठरविल्याने दिघ्यातील बांधकामांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कामय आहे. घर आणि गणराय हे नातेही मनात घट्ट रुजले आहे आणि आता अचानक घर सोडून इतरत्र  बाडबिस्तरा हलवायचा, या कल्पनेनेच पोटात कालवाकालव होत असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी तलावाठिकाणी विसर्जनादरम्यान दिली. बिल्डरांनी फसवून आमच्याकडून पैसे घेतले आणि सरकारनेही आता बेकायदा इमारत धोरणाचा पाठपुरावा करण्यात ढिलाई दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात गणरायच काय ती सुबुद्धी देईल, असे एका रहिवाशाने हताश होऊन सांगितले. दिघ्यातील येथील एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावरील ९९ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

एमआयडीसीने तीन निवासी इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. दोन इमारतींना कोर्ट रिसीव्हरने टाळे ठोकले आहेत. त्यातील काही  एमआयडीसीच्या ताब्यात दिल्या आहेत. या पाच इमारतीतील  २०० च्या वर कुटुंबे बेघर झाली आहेत. काही जणांनी तर गावचा रस्ता धरला आहे. काहींनी भाडय़ाच्या घरात संसार थाटला आहे. ३० सप्टेंबर २०१५ रोजी दिघ्यातील इमारतीवर पहिला हातोडा पडला. तेव्हापासून आजतागायत कारवाईची टांगती तलवार रहिवाशांच्या डोक्यावर आहे. मागील वर्षी दिवाळी व दसरा साजरा न करण्याचा निर्णय दिघावासीयांनी घेतला होता. यंदा गणेशोत्सव धूमधडक्यात सुरू असताना शासनाने उच्च न्यायालयात पॉलिसी सादर केली आहे. ती मान्य करून दिघावासीयांना दिलासा द्यावा, असे साकडे घरे बचावासाठी गणरायाला घालण्यात येत होते.

या इमारतींना नोटीसा

ईश्वरनगर परिसरातील सिडको भूखंडावरील अमृतधाम, दुर्गामाता प्लाझा, अवधूत छाया, दत्तकृपा या चार इमारतींना नोटिसा.

सिडकोच्या भूखंडावरील इमारतीना नोटीसा आल्यामुळे आता एमआयडीसीच्या घरांना देखील नोटीसा येण्याची शक्यता असल्यामुळे कोणत्याही क्षणी घरांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे.  एक वर्षांपासून कारवाईची टांगती तलवार डोक्यावर आहे. इमारतीवर कारवाई होण्याच्या भीतीने जीव कासावीस होत आहे.

-दिलीप बिऱ्हाडे, दिद्या रहिवासी