उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या १६८ जणांमध्ये ५६ महिला

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात बाधितांची संख्या सात हजारांवर पोहोचली आहे. यात महिलांना कमी लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित महिलांची संख्या अडीच हजार आहे. पालिका क्षेत्रात उपचारादरम्यान महिलांचा मृत्युदर निम्म्याहून कमी असल्याचे पालिकेने आजवर जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पनवेल शहर पालिका क्षेत्रात २२ हजारांहून अधिक नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी सात हजार नागरिकांना बाधा झाली आहे. सध्या पालिका क्षेत्रात प्रशासनाने सहा ठिकाणी प्रतिजन चाचण्या सुरू केल्या आहेत. शहरातील दोन आणि विविध सिडको वसाहतींमधील नागरी आरोग्य केंद्रांत चाचणीला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ज्या नागरिकांमध्ये लक्षणे आहेत असेच संशयित रुग्ण चाचणी करीत आहेत. अनेक जण करोना चाचणी करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे चाचणी प्रक्रिया गती घेताना दिसत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात साडेचार हजार पुरुषांना बाधा झाली. हा आकडा मार्च ते जुलैपर्यंतचा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. याच कालावधीत अडीच हजारच्या आसपास महिला बाधित झाल्या. यात महिलांचे बरे

होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांपर्यंत असल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागात झाल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या १६८ जणांमध्ये ५६ महिलांचा समावेश आहे, तर पुरुषांत बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के इतके असल्याचे शिंदे यांनी सांगितले.