पनवेल : कामोठे येथील रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाने वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयातून पळ काढल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली. या घटनेनंतर ३२ वर्षीय  फरार  रुग्णाचा शोध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला, मात्र तो न सापडल्याने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या दरम्यान या रुग्णाच्या पित्याच्या पार्थिवावर सरकारी व्यवस्थेने अंत्यविधी करण्यात आला, मात्र तेथेही रुग्ण पोहचला नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. गेल्या ८ दिवसांपासून हा रुग्ण एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याची प्रकृती सुधारली होती.  त्याला डॉक्टर घरी सोडणार होते असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संबंधित रुग्ण कामोठे येथील सेक्टर १४ मधील साईदीप सोसायटीमध्ये राहणार असल्याचा पत्ता रुग्णालयाकडे नोंदविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तो पत्नी व कुटुंबीयांसोबत कळंबोली वसाहतीमध्ये राहत असल्याचे   तपासात समोर आले. फरार रुग्णाच्या पत्नीला घरीच प्रतिबंधित क्षेत्रात ठेवण्यात आल्याने अधिक तपास पोलीस करु शकले नाहीत.  फरार करोना रुग्णाने त्याचा मोबाईल फोन बंद करुन ठेवल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.