दहा केंद्रांवर दररोज एक हजार आरोग्य सेवकांना लस

नवी मुंबई पहिले तीन दिवस लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर २२ व २३ जानेवारी रोजी शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता दररोज एक हजार करोनायोद्धांचे लसीकरण करण्यात येणार असून याससाठी दहा केंद्रांवर नियोजन केले आहे.

१६ जानेवारीपासून नवी मुंबईत आरोग्य सेवकांना शासनाच्या नियमावलीनुसार लस दिली जात असून २५ जानेवारीपर्यंत २५०४ जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. लसीकरणसाठी पालिका प्रशासनाने चार केंद्रांवर नियोजन केले होते. यात दरदिवशी ४०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले होते.  २२ व २३ जानेवारी रोजी १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या आठवडय़ापासून लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता दहा केंद्रांवर दरदिवशी एक हजार जणांची लसीकरणात करण्यात येणार आहे. रिलायन्स रुग्णालयात केंद्र वाढविण्यात आली आहेत. ५० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन असल्याचे लसीकरणप्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.

     आतापर्यंतचे लसीकरण

            लसीकरण       टक्केवारी

१६ जानेवारी     ३१३         ७८.२५

१९ जानेवारी     ३४७         ६८

२० जानेवारी     ४००          ९१

२२ जानेवारी     ४००          १००

२३ जानेवारी     ४००          १००

२५ जानेवारी     ७९२          ७९

लसीकरण केंद्र

* अपोलो हॉस्पिटल :                         ०३

*  डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय :       ०२

* वाशी सार्वजनिक रुग्णालय :           ०१

* ऐरोली सार्वजनिक रुग्णालय :          ०२

* रिलायन्स हॉस्पिटल :                      ०२

२५०४  जणांचे लसीकरण