आठवडय़ातील चार दिवस एकाच सत्रात कार्यक्रम; ‘ ते’ ३१३ जण ठणठणीत

नवी मुंबई : देशात करोना लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर नवी मुंबईतील ३१३ जणांना श्निवारी लस देण्यात आली होती. हे सर्वजण लसीकरणानंतर ठणठणीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असून यातील तीन जणांना काही काळ लस टोचल्याच्या ठिकाणी दुखणे जाणवले असून काही प्रमाणात अस्वस्थता जाणवली होती. पहिल्या दिवशीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता पालिका प्रशासनाने पुढील नियोजन केले असून मंगळवारी चारशे करोनायोद्धय़ांना लस देण्यात येणार आहे.

गेले दहा महिने सुरू असलेल्या करोना साथीविरोधातील युद्ध जिंकून या नव्या रोगाला हद्दपार करण्यासाठी देशभर महालीसकरण मोहीम शनिवारपासून सुरू झाली आहे. सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे ७४ हजार डोस ठाणे जिल्ह्य़ाला मिळाले असून यातील २१ हजार २५० लशींच्या कुप्या नवी मुंबईला मिळाल्या आहेत. यानुसार पालिका प्रशासनाने नियोजन केले असून शनिवारी पहिल्या दिवशी चार केंद्रांवर ४०० जणांना लस देण्यात येणार होती. मात्र यातील ३१३ जण लसीकरणासाठी उपस्थित राहिल्याने त्यांना लस देण्यात आली होती. हे सर्व जण ठणठाणीत बरे असल्याचे पालिका लसीकरणच्या प्रमुख अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले. यातील तीन जणांना किरकोळ त्रास झाला होता. त्यांना लस दिलेल्या ठिकाणी काही काळ दुखत असल्याचे जाणवले तर काहीशी अस्वस्थता जाणवली. मात्र ती काही काळच होते. त्यामुळे पहिल्या दिवसाचे लसीकरण यशस्वी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यानुसार आता पाीलका प्रशासनाने पुढील नियोजन केले आहे. आठवडय़ात मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी लसीकरण होणार नाही. त्यानुसार मंगळवारी  शहरातील चार लसीकरण केंद्रांवर ४०० करोनायोद्धय़ांना लस देण्यात येणार आहे.

पुढील काही दिवस दिवसाला चारशे जणांना लस देण्याचे नियोजन आहे. मात्र यातील काही जण बाहेरगावी आहेत, तसेच काहींना शारीरिक त्रास असल्याने कमी जणांचे लसीकरण होत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ४०० पैकी ३१३ जणांना लस देण्यात आली. त्यातील फक्त ३ जणांना सौम्य लक्षणे जाणवली. ३१३ जण ठणठणीत असून या आठवडय़ात ४ दिवस लसीकरण होणार आहे. गुरुवारी लसीकरण होणार नाही.

अभिजीत बांगर, आयुक्त