११८२ खाटांची व्यवस्था; तपासणीसाठीच्या सर्व सुविधा सज्ज

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या  तीन हजारांच्या नजीक येऊन पोचली आहे. बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांच्या खाटांची कमतरता जाणवत असल्याने अनेकांची फरफट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या वाशी येथील प्रदर्शनी केंद्रातील ११८२ खाटांचे स्वतंत्र ‘कोविड’ रुग्णालय  येत्या गुरुवापर्यंत सुरू होण्याची  शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेच्या वाशी रुग्णालयासह तेरणा, रिलायन्स, फोर्टीस आणि अपोलो रुग्णालयातही कोविडसाठी राखीव खाटा आहेत. परंतु, करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने खाटांची कमतरता जाणवत आहे. काही जणांना शहरभर फिरावे लागत असल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत.

त्यामुळे पालिकेने काही दिवसांपासून वाशी येथे स्वतंत्र ‘कोविड’ रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात केली. आता ते पूर्णत्वाकडे गेले आहे आणि येत्या चार दिवसांत ते सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्था. याशिवाय तीव्र लक्षणे असलेल्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.

सध्या पालिका क्षेत्रात सात  हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही काहींना उपचारांसाठी वणवण करावी लागत आहे.

नव्या कोविड रुग्णालयात एकूण २३ कक्ष आहेत. या ठिकाणी रुग्णांच्या सुविधेसाठी टीव्ही तसेच पिण्यासाठी गरम पाणी, याशिवाय जेवणाची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय रुग्णालयात करोना चाचणीचे स्व्ॉब घेण्यासाठीची व्यवस्था, एक्स-रे, रक्त तपासणी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

सुविधा अशा..

* सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी  ४५९४ खाटांची सोय

* धोकादायक अवस्थेतील रुग्णासाठी १६२० खाटा, तर अतिधोकादायक अवस्थेतील रुग्णांसाठी ८०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

* एकूण खाटा : ११८२

* ऑक्सिजन सुविधेसह खाटांची संख्या : ५००

* साध्या खाटा : ६८२

* तात्काळ रुग्ण हलविण्यासाठी १० खाटांची व्यवस्था

गुरुवार, ११ जूनपासून हे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. या रुग्णालयामुळे कोविड उपचारांसाठी ६, ५०० हून अधिक खाटांची व्यवस्था होणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका