नवी मुंबई : शहरात करोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून रोज १२००च्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यात प्रतिजन चाचण्यांची भर पडली आहे. येत्या काळात अधिकाधिक प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.

शीघ्र तपासणी, अलगीकरण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारावर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नियंत्रणासाठी ‘मिशन ब्रेक द चेन’ घोषित केले आहे. अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४० हजार प्रतिजन चाचण्यांचा संच पालिकेकडे सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त केंद्रे सुरूकरण्यात येणार आहेत. बाधित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. त्यांच्यात करोनासदृश लक्षणे असलेल्या प्रत्येकाची प्रतिजन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाशी सेक्टर-१० मधील पालिकेच्या कोविड रुग्णालयात प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. आजवर शहरात १६हून अधिक प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील घटकांच्या प्रतिजन चाचण्यांसह शहर पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने तीन दिवसांत १,८५२ पोलिसांच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात

७४ पोलीस बाधित आढळले आहेत.

नवी मुंबईत रोज ४०० ते ५०० चाचण्या करण्या येत होत्या. ही संख्या प्रतिदिन १२०० झाली आहे. तरीही कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.