महापालिका लवकरच सल्लागार नेमणार

ठाणे-बेलापूर मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या वाहतुकीवर उपाय म्हणून घणसोली ते ऐरोली या दोन किलोमीटरच्या विस्तारित पामबीच मार्गासाठी नवी मुंबई पालिका लवकरच आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमणार आहे. खारफुटीच्या जंगलामुळे हा विस्तारित मार्ग घणसोली येथे पूर्ण होऊ न शकल्याने गेली बारा वर्षे रखडला आहे. खारफुटीला धक्का न लावता वरळी सी लिंकप्रमाणे या ठिकाणी खाडीपूल बांधण्याबाबत ही सल्लागार समिती आपला अभिप्राय देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना विकास प्रकल्पांना खारफुटीमुळे अडथळा येता कामा नये असे, निर्देश दिले आहेत.

ठाणे-बेलापूर मार्ग, शीव-पनवेल महामार्ग असे दोन विस्तीर्ण आणि प्रचंड रहदारीचे रस्ते नवी मुंबईतून जातात. या दोन्ही मार्गावरून रोज तीन लाख वाहनांची ये-जा होते. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविता यावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तळवली ते घणसोली रेल्वे स्थानकापर्यंत तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. पुढील वर्षी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच वेळी शीव-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने वाशी खाडीपुलावर आणखी एक खाडीपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर ७७५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी एमएसआरडीसीने ठेवली आहे. पुढील तीन वर्षांत या पुलाची उभारणी होणार आहे. याबरोबरच पामबीच मार्गाचा विस्तारित मार्ग असलेल्या वाशी-ऐरोली या मार्गाची निर्मिती करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

सिडकोने १८ वर्षांपूर्वी वाशी ते बेलापूर या ११ किलोमीटर लांबीच्या पामबीच मार्गाची निर्मिती केली. त्यानंतर हाच मार्ग पुढे कोपरखैरणे मार्गे ऐरोली येथील नियोजित आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राच्या भूखंडाला जोडण्यात आला आहे. या मार्गामुळे नवी मुंबईतील अंतर्गत मार्गावरील वाहनांना मुंबई अथवा ठाण्याकडे जाणे सुलभ होणार आहे. पामबीच मार्गावर होणाऱ्या वेगवान वाहतुकीप्रमाणे या मार्गावरूनही कोपरखैरणेनंतर पाच मिनिटांत ऐरोली खाडीपूल गाठणे शक्य होणार आहे. वाशी ते कोपरखैरणेपर्यंत रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करणाऱ्या पालिकेला हा रस्ता पुढे सिडको तयार करून देणार होती. कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यानच्या पाच किलोमीटर मार्गापैकी सिडकोने घणसोलीपर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. मात्र या मार्गात घणसोली ते ऐरोली दरम्यान दोन किलोमीटरचे विस्तीर्ण खारफुटीचे जंगल आहे. यामुळे राज्य पर्यावरण मंडळाने या मार्गाला आडकाठी केली होती. त्यामुळे गेली १२ वर्षे हे काम प्रलंबित आहे. नुकत्याच एका सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या विकास प्रकल्पात खारफुटीचा अडथळा येता कामा नये, त्यावर उपाय शोधावेत, असे निर्देश दिले आहेत. विकास प्रकल्पांच्या आड येणाऱ्या खारफुटीचे इतर ठिकाणी स्थलांतर करताना पाचपट खारफुटीचे उद्यान निर्माण करण्याची हमी संबंधित विकास प्राधिकरणाला द्यावी लागते.

नवी मुंबई पालिकेने या दोन किलोमीटर अंतराच्या खारफुटीच्या जंगलातून वरळी सी-लिंकप्रमाणे खाडीपूल बांधता येईल का याची चाचपणी करण्यासाठी सल्लागार कंपनी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर या खाडीपुलाचा विचार पालिका करणार आहे. स्थानिक नगरसेवकांच्या आग्रहास्तव नवी मुंबई पालिकेने आठ महिन्यांपूर्वी घणसोली नोड हस्तांतरित करून घेतला आहे. त्यामुळे या विस्तारित पामबीच मार्गाचे उत्तरदायित्व पालिकेवर येऊन ठेपले आहे. हा नोड हस्तांतरित करून घेताना काही नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता. सिडकोकडून या विभागातील सर्व सेवासुविधा घेतल्यानंतरच हा नोड हस्तांतरित करून घेणे आवश्यक होते, अशी या नगरसेवकांची भूमिका आहे.

घणसोली ते ऐरोली दरम्यान खारफुटीमुळे रखडलेल्या विस्तारित पामबीच मार्गाची नैतिक जबाबदारी सिडकोची आहे, मात्र नोड हस्तांतरित करून घेतल्यानंतर हा अडथळ्याचा गुंतादेखील पालिकेला सोडवावा लागणार आहे. हा मार्ग शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यास कारणीभूत ठरणार असून अंतर्गत मार्गावरील वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गावर येण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे हा रस्ता लवकर वाहतुकीस तयार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खारफुटीला धक्का न लावता खाडीपूल उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमला जाणार आहे.

– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका