ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात रोहित पक्ष्यांच्या निरीक्षणाची पर्वणी

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या खाडी सफरीला पर्यटक आणि अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचे प्रमाण वाढू लागल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे खाडीतील जैवविविधतेची माहिती देण्यासाठी आणि पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करण्याची संधी मिळवून देण्यासाठी ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात नौकाविहार सुरू करण्यात आला आहे. यंदा रोहित पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले असले, तरी आता त्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खाडीसफरीला पर्यटक, पक्षीनिरीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ फेब्रुवारीपासून नौकाविहार सुरू झाला असून २४ आसनी ‘एस बी फ्लेमिंगो’ बोट तर विशिष्ट गटांसाठी प्रीमियम बोट सुरू आहे. ऐरोली ते वाशीदरम्यान  २६ किलोमीटरची सफर केली जात आहे.

रोज ३०-५० पर्यटक

रोज भरती-ओहोटीनुसार कमीत कमी दोन फेऱ्या होत आहेत. २४ आसनी बोट पूर्ण भरलेली असते. दोन्ही बोटींतून दररोज ३० ते ४८ पर्यटक प्रवास करतात. २४ आसनी बोटीसाठी प्रतिव्यक्ती ३०० ते ४०० रुपये तर प्रीमियम बोटीसाठी सात जणांच्या गटाला सहा हजार रुपये शुल्क आकारले जाते.b