अभ्यासातील व्यत्ययाने पालकांकडून नाराजीचा सूर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देणाऱ्या इयत्ता १० व १२ च्या परीक्षा सुरू असून याच ऐन परीक्षांच्या काळात उरण तालुक्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीने रात्रभर चालणाऱ्या प्रकाश झोतातील लाखो रुपयांची पारितोषिके असलेले क्रिकेटचे सामने भरविले जात आहेत. या सामन्यांसाठी राजकीय पक्षांचे नेते व मंत्रीही हजेरी लावणार असल्याचे बॅनर सध्या झळकू लागले आहेत. त्यामुळे स्पर्धा भरविणाऱ्या आयोजकांमध्येही उत्साह आहे. मात्र याचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना होत असताना लोकप्रतिनिधीच  किंवा त्यांच्या नावाने हे सामने आयोजित करण्यात येत असल्याने पालकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

परीक्षांच्या कालावधीत क्रिकेटसारख्या तरुणांना आकर्षित करणाऱ्या खेळाच्या स्पर्धा भरविण्यात येऊ नये असे आवाहन उरण मधील सामाजिक संस्थांनी केले होते. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत येथील लोकप्रतिनिधींनीच या कालावधीत सामने भरविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व पक्षीयांचा सहभाग आहे. मार्च महिन्यातच उरण तालुक्यात २ ते तीन लाख रुपयांची पारितोषिके असलेल्या स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. यामध्ये पालकमंत्री चषक, आमदार चषक, भव्य रजनी क्रिकेट या स्पर्धा असून भाजपा, मनसे, शिवसेना यांच्यासह या पक्षांसह इतर पक्षांनी या स्पर्धा भरविल्या आहेत. विशेष म्हणजे बेलपाडा येथील स्पर्धेला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता तसेच गृहराज्य मंत्री राम शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर झळकले आहेत. तर भेंडखळ येथील मनसेच्या स्पर्धासाठी अमित ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे उरण शहरात परीक्षांच्या काळातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी केली आहे. या संदर्भात उरणच्या महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रवीण साळी यांना निवेदन दिले आहे. साळी यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता करंजा परिसरातील वीज वाहक तारांवर वृक्ष पडल्याने वीज खंडित झालेली होती. ती पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.