शेखर हंप्रस

नवी मुंबईतील गुन्ह्यंच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत एक हजाराची वाढ; सोनसाखळी चोरी,वाहनचोरीचे प्रमाण अधिक

गेल्या वर्षांत लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीची अटक ही नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी असली तरी २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्हेगारी वाढली आहे. साखळी चोरीने पुन्हा डोके वर काढले असून हत्या, विनयभंग, फसवणूक, वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत वाढ दिसत आहे. एकूण ५ हजार ५१५ गुन्हांची नोंद झाली असून ३ हजार ६३२ गुन्ह्य़ांची उकल करण्यात यश आले आहे.

नवी मुंबई पोलिसांचा कामगिरीचा २०१८ चा तुलनात्मक अहवालातील आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हेगारी वाढल्याचे आकडेवारी दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांशी निगडीत गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंगाचे प्रमाण २०१७ च्या तुलनेत अनुक्रमे २२ आणि ३० ने वाढले आहे. या शिवाय हत्या ८, हत्येचा प्रयत्न २०, दरोडा १०२, साखळीचोरी ४९, वाहनचोरी २२१, अपहरण १२२ एवढी वाढ २०१७ च्या तुलनेत २०१८ला झाली आहे. गुन्हे उकल होण्याच्या टक्केवारीतही घसरण झाली असून २०१८ मध्ये ५ हजार ५१५ गुन्ह्य़ांची नोंद झाली असून पैकी ३ हजार ६३२ गुन्हय़ांची उकल झाली आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण ४ हजार ५६१ गुन्हय़ांपैकी ३ हजार २६८ गुन्हे असे होते. टक्केवारी २०१७ मध्ये ७२ तर टक्के गुन्हे उकल करीत राज्यात सर्वाधिक गुन्हे उकल करणाऱ्यांत नवी मुंबई पोलीस होते. मात्र २०१८ मध्ये हे प्रमाण घसरून ६६ टक्क्यांवर आले आहे.

२०१८ मध्ये नवी मुंबई पोलिसांच्या नावे अनेक चांगले गुन्हे उकलची नोंद झाली आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खारघर परिसरात लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तीन पोलीस आयुक्तालय आणि रायगड जिल्हा त्याच्या मागावर तीन वर्षांपासून होते. त्याला नवी

मुंबई पोलिसांनी घोडबंदर येथे अटक करून २३ पेक्षा जास्त विनयभंग आणि सात बलात्काराचे गुन्हे उघडकीस आले. तर पोलिसांवर हल्ला करणारा आणि साखळीचोरीतील अट्टल समजल्या जाणाऱ्या फय्याज शेख याची अटकही साखळीचोरी रोखण्यास मोलाची ठरली. त्यामुळे १०० पेक्षा जास्त गुन्हे उकल झाले.

२०१७ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या दरोडय़ातील अनेक आरोपी २०१८ मध्ये जेरबंद करून ३ करोडच्या आसपास चोरीचा माल जप्त केला गेला.

मुंबईतील प्रथितयश बँकेतील संचालक हत्येप्रकरणी आरोपीस अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले होते.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेगारी आटोक्यात आहे. गुन्हे उकल होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. मात्र काही गंभीर गुन्हय़ांत वाढ होत आहे. या बाबत आम्हीही उपाययोजना करीत आहोत. अनेक गंभीर, किचकट गुन्हय़ांची उकल आम्ही करू शकलो, ही समाधानाची बाब आहे.

– तुषार दोषी, उपायुक्त गुन्हे शाखा