ना धमकी, ना जबरदस्ती, ना मारहाण.. फक्त एक आगळावेगळा सापळा. बस्स. समोरची व्यक्ती अलगद त्या सापळ्यात अडकते आणि आपोआप त्या व्यक्तीचे अपहरण होते. हरयाणामधल्या एका कुख्यात टोळीची ही कार्यपद्धती. नालासोपाऱ्यातील एक तरुण उद्योजक या टोळीच्या सापळ्यात अडकला. त्याची सुटका करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते..

१३ जुलै २०१६. नालासोपाऱ्यातील तरुण उद्योजक चिराग जोशी (२८) दिल्ली विमानतळावर  उतरला. त्याने एक मोठा फायद्याचा सौदा केला होता. चिरागचा तुर्भे येथे प्लॅस्टिकच्या वस्तू बनविण्याचा कारखाना होता. त्यासाठी लागणारे प्लॅस्टिकचे दाणे हा कच्चा माल दिल्लीतील जैन एण्टरप्रायझेस कंपनीतून स्वस्तात मिळणार होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाला जैन एण्टरप्रायझेसच्या नरेश जैन यांनी संपर्क करून स्वस्तात माल देतो असे सांगितले होते. व्हॉटस अ‍ॅपवरून मालाचे सँपलही पाठवले होते. त्या मालाच्या खरेदीचे टोकन देण्यासाठीच चिराग दिल्लीत आला होता. व्यावसायिक फायदा होणार असल्याने चिराग खूश होता. मात्र प्रत्यक्षात तो एका सापळय़ात अडकत चालला होता.

दिल्ली विमानतळावर जैन एण्टरप्रायझेसच्या प्रतिनिधीने त्याचे स्वागत केले. ‘साहेबांनी घ्यायला पाठवले आहे. आपण हरयाणात थेट कारखान्यात जाऊ. तेथे आपल्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे त्याने सांगताच चिराग त्याच्यासोबत गाडीतून निघाला. गाडी हरयाणातील नुह जिल्ह्याच्या दिशेने निघाली. चिरागला हा परिसर अनोळखी होता. त्याने पत्नी वैशालीला दिल्लीत सुखरूप पोहोचलो आणि हरयाणात निघाल्याचे सांगितले होते. काही वेळाने शहराचा भाग सोडून पुढे आलेली गाडी एका कोठीजवळ थांबली. ‘साहेब आत भेटतील’ असे सांगून प्रतिनिधीने चिरागला आत सोडले.

कोठीत प्रवेश करताच तेथे बसलेल्या एका व्यक्तीने चिरागला ‘वेलकम’ असे सांगितले आणि त्याच्या आजूबाजूला उभे असलेले सगळे जोरजोरात हसायला लागले. याच खोलीत बाजूच्या खूर्चीवर दोन इसम मान खाली घालून हताशपणे बसले होते. हे सगळं पाहिल्यानंतर चिराग गोंधळून गेला. पण हळूहळू हा सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. जैन एण्टरप्रायजेस नावाची कुठलीही कंपनी अस्तित्वातच नव्हती. स्वस्त माल देण्याचे आमिष दाखवून चिरागला कुख्यात टोळीने आपल्या जाळय़ात ओढले होते. आता त्याला ओलीस धरण्यात आले होते. कुठलीही जोर जबरदस्ती नाही, कुठलीही मारहाण नाही, शस्त्राचा वापर नाही. सावज स्वत:च चालत शिकाऱ्याच्या जाळय़ात जाऊन अडकले होते. त्याच रात्री चिरागने पत्नी वैशालीला फोन केला. ‘माझे अपहरण झाले असून त्वरित दहा लाखांची व्यवस्था करावी’ असे त्याने सांगितले. हे ऐकून वैशालीच्या पायाखालची जमीन सरकली. परराज्यात आपल्या पतीचे अपहरण झाले होते. तिने लगेच कुटुंबीयांशी चर्चा केली आणि पैशांची व्यवस्था करायला सुरुवात केली. फक्त पोलिसांना माहिती असावी म्हणून तिने नालासोपारा पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हा प्रकार ऐकून अवाक झाले. पण वैशालीला तक्रार द्यायची नव्हती. कारण अपहरणकर्त्यांना कळले असते तर चिरागच्या जिवाला धोका होता. परंतु पोलिसांनी तिला विश्वासात घेतले आणि त्याची सुटका करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल फोनचे टॉवर लोकेशन हरयाणाच्या नुह जिल्ह्यातल्या जंगलातले होते. पोलिसांनी दिल्ली आणि हरयाणा पोलिसांची मदत घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रातोरात हरयाणासाठी रवाना झाले. व्यापाऱ्यांना स्वस्तात माल देतो असे सांगून त्यांना बोलवयाचे आणि अपहरण करून खंडणी उकळायची अशी या टोळीची पद्धत होती. ही कुख्यात टोळी होती आणि आजवर कधी पकडली गेलेली नव्हती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, अशोक होनमाने यांनी आपापली दिल्ली हरयाणातील संपर्क यंत्रणा वापरून अपहरणकर्त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी वैशालीला जास्तीत जास्त वेळ अपहरणकर्त्यांशी बोलत राहायचा सल्ला दिला. जेणेकरून त्यांचे लोकेशन काढता येऊ शकेल. तिने दहा लाखांची रक्कम वाटाघाटी करून पाच लाखांवर आणली. ही रक्कम मालाड येथे एका व्यक्तीला द्यायची असे अपहरकर्त्यांनी सांगितले होते. हवालामार्फत ही रक्कम त्यांच्याकडे पोहोचणार होती. नालासोपारा पोलिसांनी साध्या वेषातले पोलीस तसेच दोन पोलीस मित्र चिरागच्या पत्नीसोबत दिले. मालाडला पैसे देण्यासाठी गेले. पैसे घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पकडायची योजना होती.

दुसरीकडे, नुह जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलदीप सिंग यांनीही पोलीस यंत्रणा कामाला लावली. रात्र सरत होती. पोलिसांना टॉवर लोकेशन मिळाले. हरयाणा आणि दिल्ली पोलिसांचे पथक सतपुतिया गावात धडकले. मात्र पोलिसांच्या कारवाईची कुणकुण अपहरणकर्त्यांना लागली. लगेच चिराग आणि अन्य दोन अपहृत व्यापाऱ्यांना तेथेच सोडून ते पसार झाले. त्यामुळे चिराग आणि अन्य दोघांची सुटका झाली. मात्र अपहरणकर्ते हाती लागले नाहीत. मालाडलाही पैसे घेण्यासाठी कुणी आले नव्हते. पुढे सखोल तपास केला असता सतपुतिया गावाचा माजी सरपंच जमेशद शमशुद्दीन हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चिराग जोशी सुखरूप नालासोपाऱ्याच्या घरी पोहोचला. त्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. अवघ्या २४ तासांत हे सुटकेचे नाटय़ यशस्वी पार पडले. अनोळखी व्यक्तीने व्यापारी असल्याचे भासवले आणि चिरागला सापळ्यात अडकवले होते. त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन त्याने केले आहे.