नवी मुंबई : क्रमांक पाटी नसलेल्या गाडी चालकाला जाब विचारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पळून गेलेल्या आरोपीस अखेर गुन्हे अन्वेषण विभागाने दोन महिन्यांनी अटक केली आहे. मारहाणीचा प्रकार नेरूळ येथे घडला होता.

प्रथमेश योगेश धुमाळ असे अटक आरोपीचे नाव असून तो नेरूळ येथेच राहणारा आहे. ३१ जानेवारीला नेरूळमधील बालाजी मंदिर टेकडी सेक्टर २० येथे पोलीस शिपाई राठोड हे गस्त घालत असताना त्यांना काही टारगट मुलांचा घोळका दिसला. बेधुंद असलेले हे पाच जणांचे टोळके रात्री पावणेबाराच्या सुमारास जोरजोरात आरडाओरडा करीत होते. या टोळक्याला राठोड यांनी हटकले व गोंधळ न घालण्याची तंबी दिली. त्या वेळी एका दुचाकीवर क्रमांकाची पाटी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने याबाबत त्यांनी प्रथमेश याला जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. वादावादी झाल्याने राठोड यांनी पोलीस ठाण्याला फोन करून अधिकची मदत मागवली. याचाच राग येत प्रथमेश याने राठोड यांच्या डोक्यात दारूची बाटली मारली. जोरदार प्रहार केल्याने फुटलेल्या बाटलीने राठोड यांच्या तोंडावर वार केला. राठोड जखमी अवस्थेत पडले असता त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडांचा मारा करून या टोळक्याने काचा फोडून गाडीचे नुकसान केले आणि घटनास्थळावरून त्यांनी पलायन केले. या घटनेबाबत संबंधित सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हा पोलीस कर्मचाऱ्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत असल्याने अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विजय चव्हाण यांनी सदर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केले होते. त्या अनुषंगाने तपास केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना बुधवारी प्रथमेशबाबत माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी त्वरित हालचाल करीत वैभव रोंगे, पोलीस नाईक सचिन म्हात्रे, रुपेश पाटील, दीपक डोंगरे यांनी आरोपी प्रथमेश योगेश धुमाळ यास खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा स्टॉप परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.