नवी मुंबईतील गुन्हेगारी २०१४ च्या तुलनेत जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत गुन्हेगारी घटल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला असला तरी चोरीच्या गुन्हय़ांचा छडा लावण्यास यंदादेखील ते अपयशी ठरले आहेत. २०१४ च्या तुलनेत तब्बल १२२ गुन्हय़ांची वाढ झाली आहे. वर्षभरात १९३ घरफोडय़ा झाल्या आहेत. गुन्हे उघड होण्याचे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. २०१४ मध्ये हेच प्रमाण ४२ टक्के इतके होते.
४८ हत्यांपैकी केवळ दोनच हत्यांचा तपास लागलेला नाही. २०१४ साली ९० तर २०१५ मध्ये १०४ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. १०३ गुन्हय़ांचा तपास लागला आहे. २०१४ मध्ये ५४९ २०१५ मध्ये गुन्ह्य़ाची संख्या ६०९ इतकी होती. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण, गुन्हे पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, उपायुक्त शहाजी उमप, अरविंद साळवे, सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे यांनी माहिती दिली. दुचाकी चोरीच्या उघडकीस आणण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. लॅपटॉप चोरीच्या गुन्हय़ांच्या तपासात सहा टक्के यश आले आहे. महिला अपहरणाच्या घटनामध्ये २०१४ मध्ये १३८ इतकी होती, तर २०१५ मध्ये हे प्रमाण २२७ इतके आहे. २२७ पैकी ५६ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१४ मध्ये सर्व प्रकारच्या गुन्हय़ांची संख्या ५२८८ इतकी होती. यामध्ये ३६५१ गुन्हय़ांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला असून २०१५ साली ५४०५ गुन्हे नोंदले असून ३६२० गुन्हय़ांचा तपास करण्यात यश आले आहे. विनयभंगाचे प्रमाण २०२ इतके असून १९५ गुन्हय़ांचा तपास पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रस्ते अपघातांची संख्या २०१४ मध्ये ५१६ इतकी होती, तर २०१५ मध्ये ६०४ इतकी आहे. रबाले, रबाले एमआयडीसी व कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे आयुक्तांनी सांगितले. सीसीटीव्हीमुळे महत्त्वाचे गुन्हे उघडण्यास मदत झाल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी सीसीटीव्हीचा वापर अधिक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.