नवी मुंबईत हत्येच्या प्रकरणांचे प्रमाण अधिक

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

नवी मुंबईत गेल्या सहा महिन्यांत गुन्ह्य़ांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या पाहता सध्याचे मनुष्यबळ कमी असले तरी अनेक ठिकाणी पोलिसांच्या कामांचा उरक काहीसा निराशाजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जानेवारी ते जून २०१७ आणि २०१८ ची तुलना करता गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. गतवर्षी या कालावधीत २०१६ गुन्ह्य़ांची नोंद झाली होती, तर यंदा २६५० गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.

हत्येच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. गुन्ह्य़ांची उकल करण्यातही पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. आर्थिक फसवणुकीत सर्वात जास्त फसवणूक ही जागा खरेदी-विक्री आणि नोकरीचे आमिष दाखवून झाली आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात नोकरीचे आमिष दाखवून ४ ते ५ कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाशीतील अतिशय प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाला फसवणूक प्रकरणी अटक झाली आहे.

तत्कालीन आयुक्त के. एम. प्रसाद यांच्या काळात सोनसाखळी चोरांना मुंब्रा येथील रशीद कम्पाउंड असो वा कल्याणनजीक असलेले आंबिवली गाव असो थेट घुसून अटकसत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबईत बराच काळ सोनसाखळी चोरटे फिरकत नव्हते, मात्र सध्या यातही वाढ झाल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

उल्लेखनीय उकल

जानेवारी ते जूनदरम्यान कामोठे दरोडाप्रकरणी गुन्हेगारांना केलेली अटक आणि २ किलो सोन्याची जप्ती तसेच कामोठे येथेच एका व्यापाऱ्याची हत्या या दोन्ही गुन्ह्य़ांत धागादोरा नसताना गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, फसवणूक या गुन्ह्य़ांचे आव्हान आहे.

गुन्ह्य़ांचे प्रमाण निश्चितच वाढले आहे, मात्र नवी मुंबईकरांच्या मनात असुरक्षिततेची भावना नाही, हे पोलिसांचे यश आहे. आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्य़ांबाबत अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. आम्हीही आणखी जनजागृती करणे गरजेचे आहे.

– तुषार दोषी, उपायुक्त, गुन्हे शाखा