‘पोलीस मित्र’ संकल्पना राबविण्याचे नियोजन

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत विविध प्रकारचे २ हजार ५४७ गुन्हे नोंद झाले असून यातील १ हजार २२९ गुन्हे उकल झाले आहेत. यावरून शहरातील गुन्हेगारीचा आलेख हा वाढता दिसत आहे. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना पुन्हा राबविण्याचा विचार करीत आहेत.

यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या कार्यकाळात ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना नवी मुंबईत राबवण्यात आली होती. त्यामुळे साखळीचोरी, वाहनचोरी, घरफोडी चोरीतील अनेक आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले होते.

नवी मुंबई शहराला एक शांत, राहण्याजोगे व स्वच्छ शहर म्हणून राहण्यास पसंती देत आहेत. मात्र शहरातील गुन्हेगारी मात्र वाढताना दिसत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत शहरात विविध प्रकारचे २ हजार ५४७ गुन्हे नोंद झाले आहेत. मार्चनंतरही करोनामुळेही लागू झालेल्या टाळेबंदीतीही गुन्हे थांबलेले दिसत नाहीत. मार्च ते ऑगस्ट सहा महिन्यात १ हजार ५६२ गुन्ह्यंची नोंद झाली आहे. ऑगस्टनंतर टाळेबंदीत हळूहळू शिथिलता देण्यात आल्यानंतर हा गुन्ह्यंचा आलेख वाढताच आहे. गेल्या तीन महिन्यांतील तांत्रिक कारणास्तव गुन्ह्यंची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुन्ह्यंचे प्रमाण वाढतेच आहे. गत सायबर गुन्हेगारीसह जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीचे गुन्हे अधिक आहेत. अनेकांच्या हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार झाले आहेत. यातील काही तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिह यांच्या मार्गदर्शखाली यापूर्वी राबविण्यात आलेली ‘पोलीस मित्र’ संकल्पना पुन्हा राबविण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १५० पोलीस मित्रांची निवड करण्यात येणार आहे.

माहितीदूत

शहरातील सामाजिक भान असलेल्यांना पोलीस मित्र होता येते, मात्र कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी चालत नाही. विविध ठिकाणी वावर असलेले हरहुन्नरी व्यक्तींचा यात समावेश असतो. एखादी गोष्ट समाजविघातक असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती देणे, संशयास्पद व्यक्ती वा वस्तूबाबत पोलिसांना कळवावी लागते. त्यांना पोलीस विशेष मार्गदर्शनही करतात.

पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संकल्पना आकारास येत आहे. याबाबत काही गोष्टी विचाराधीन असून लवकरच यावर अंमलबजावणी केली जाईल. कायद्याची जरब बसवताना नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.

–  सुरेश मेंगडे ,पोलीस उपायुक्त

गुन्हेगारी वाढीचा आलेख

महिना            एकूण

जानेवारी      ४४८    (७३)

फेब्रुवारी       ५३७    (२७०)

मार्च             ५०७    (३४९)

एप्रिल            ९४     (४७)

मे                 ११७    (७४)

जून               २४८    (१२६)

जुलै              २८२    (१३०

ऑगस्ट         ३१४    (१६०)

एकूण :      २५४७    (१२२९)

(कंसात उकल गुन्हे)