दहा ते १२ फुटी गणेश मूर्तीची दहा महिने आधीच निर्मिती

नवी मुंबई</strong> : गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीतच तयार करण्यात आलेल्या दहा ते १२ फुटी मूर्तीचे काय, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. कर्ज काढून तयार करण्यात आलेल्या मोठय़ा उंचीच्या मूर्तीची विक्री होणार नसल्याने शासनाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सव आणि गणेश मूर्तीच्या नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. यात घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची उंची ही चार फुटांहून अधिक नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी पेण येथील मोठे मूर्तिकार हे मागील वर्षीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर, तर छोटे मूर्तिकार मार्चपासून मूर्ती तयार करण्यावर भर देतात. त्यामुळे शासनाने करोनाकाळात जाहीर केलेल्या धोरणामुळे मूर्तिकारांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पेण आणि मुंबईतील काही मूर्तिकारांच्या मते, यंदाच्या गुंतवणुकीचा परतावाही मिळण्याची शक्यता नाही.

राज्यात गुढीपाडव्यापासून मराठी सणांना सुरुवात होते. यात गणेशोत्सवाची तयारी खूप आधीपासून करावी लागते. गणेशमूर्तीना विदेशातही मोठी मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांना आधीपासून तयारीला लागावे लागते.

यंदा मार्चपासून देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने नियमावली तयार केली आहे. अंतराचा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यावधीस अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे सरकारला कळवले आणि त्यानंतरही सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली.

यात घरगुती गणपती दोन फूट, तर सार्वजनिक गणेश मंडळांची गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत असावी, असा नियम घालून देण्यात आला. यात आधीपासून चार फुटांहून अधिक उंच मूर्ती मूर्तिकारांनी कारखान्यांमधून साकारल्या आहेत. आता शासनाच्या नव्या आदेशामुळे आधीच्या उंच मूर्ती तशाच ठेवण्यावाचून पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया एक मूर्तिकाराने दिली.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मूर्तीचे ९० टक्के काम पूर्ण होते, तर दहा टक्के काम शिल्लक असते. यात चार फुटांहून अधिक उंची असलेल्या मूर्ती ८० टक्के असतात, २० टक्के छोटय़ा मूर्ती असतात.  गणेशोत्सवाच्या आधी दीड ते दोन महिने मूर्ती विक्रीसाठी बाहेर काढल्या जातात. मात्र यंदा टाळेबंदीमुळे नुकसान वाढण्याची भीती मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.

सध्या छोटय़ा मूर्तींना २० टक्केच मागणी असल्याची माहिती पेण येथील हमरापूर विभागातील मूर्तिकार संघटनांनी दिली. यंदा ३० ते ४० टक्के मूर्ती विकल्या जाणार असल्याने आर्थिक नुकसान होणार असल्याचे पेण येथील श्री गणेश मूर्तिकार  मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर  यांनी सांगितले.

कर्जाचीही चिंता

मूर्तिकारांना यासाठी या साऱ्या कामांसाठी कर्ज काढावे लागते. यात कमीतकमी पाच आणि जास्तीत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज काढले जाते. यंदा कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना मूर्तीची विक्री होणार नसल्याने नवे संकट ओढावल्याची भावना मूर्तिकारांनी बोलून दाखवल्या.

यंदा काही मूर्तीचे विसर्जन करण्याची वेळ येईल. कर्ज घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यंदा ओढवलेल्या करोना संकटात शासनाने निदान कर्जमाफी करावी वा व्याज माफ करावे.

कुणाल पाटील, अध्यक्ष गणेश उत्कर्ष मंडळ, हमरापूर विभाग, पेण

४ फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती आधीच तयार करण्यात आल्या आहेत. त्या कारखान्यात पडून आहेत. त्यामुळे शासनाने निदान भरपाई तरी द्यावी.

-संतोष चौलकर, अध्यक्ष श्री. गणेश मूर्तिकार संघटना, नवी मुंबई</strong>