प्रशासनाकडून पोलिसांची मदत; नोंदणी केलेल्या वाहनांनाच प्रवेश

नवी मुंबई : एपीएमसीतील भाजी मार्केट शासनाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आले, मात्र खरेदीदारांनी एकच गर्दी झाल्याने एपीएमसी प्रशासनावर टिका होत होती. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांची मदत घेत आता या गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे . बाजार आवारात विशिष्ट अंतरानेच खरेदीदारांना प्रवेश दिला जात असून भाजीपाल्याच्या आवकीवर मर्यादा घातली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे करोना संसार्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत संचारबंदीकाळात व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र यामुळे जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेत शासनाने भाजी व धान्य बाजार सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे इच्छा नसतानाही व्यापाऱ्यांनी बाजार सुरू केला होता. मात्र खरेदीदारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याने त्यांची चिंता वाढली होती. विशेषत: भाजीपाला बाजारात जास्त गर्दी होत होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे हा बाजार तात्पुरता स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र सोमवारी एपीएमसी प्रशासनाने याची दखल घेतल्याचे चित्र होते. सकाळी बाजारात सामाजिक अंतर ठेवून तसेच प्रवेशद्वारावर वाहनांचे र्निजतुकीकरण करून बाजार सुरू करण्यात आला. व्यापाऱ्यांकडून किती माल मागवला, वाहनाचा नंबर ही सर्व माहिती घेत ती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार परवानगी मिळालेल्याच वाहनांना पोलिसांनी प्रवेश दिला.

आज दोनशे ते अडीचशे गाडय़ांचीच आवक झाली होती. परंतु प्रशासनाने परवानगी दिलेल्या ६० वाहनांनाच बाजारात प्रवेश दिला. उर्वरित १८० ते २०० वाहने परस्पर मुंबईत पाठवून दिल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच केवळ दोन प्रवेशद्वारेच खली ठेवण्यात आली होती.

प्रत्येक वाहनांवर जंतुनाशक फवारणी करण्यात येत होती. खरेदीदाराला हात स्वच्छ धुण्यास सांगितले जात होते. सामासिक अंतर ठेवण्यासाठी लाकडी अडथळे लावण्यात आले होते. यामध्ये विशिष्ट अंतरावर एका रांगेत खरेदीदारांना सोडले जात होते. बाजारात ही शिस्त ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

खारघर स्थलांतराबाबत व्यापारी संभ्रमात

भाजीपाला बाजारातील दोन दिवसांच्या गोंधळाने भाजीपाला व्यापार सुरक्षितेच्या दृष्टीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे स्थलांतराचे नियोजन कोकण विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र खारघर हे व्यापारी व खरेदीदार यांना दळणवळणासाठी लांब पडणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी व्यापारी खारघर येथे स्थलांतर होण्यास इच्छूक नाहीत. या स्थलांतराबाबत शासनाच्या बैठकीत निर्णय होईल असे मत भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.