वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत ४५० ट्रक

नवी मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू कराव्या लागलेल्या तर्भे येथील भाजीपाला घाऊक बाजारात शुक्रवारी पहाटे अक्षरश: खरेदीदारांची झुंबड उडाली होती. कोणतीही खबरदारी न घेता बाजारात आलेल्या या खरेदीदारांमुळे व्यापारी मात्र कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. अन्न धान्य व ड्टााजी बाजारपेठे सुरू करण्याचा आग्रह करणाऱ्या एपीएमसीच्या नियोजनाचा यामुळे पार फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाची टाळेबंदी जाहीर केली आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केली जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्भे येथील भाजी व अन्न धान्य या दोन घाऊक बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोकण विभागिय आयुक्त शिवाजी दौंड यांनी बैठका घेऊन व्यापाऱ्यांना या जीवनावश्यक बाजारपेठा सुरू करण्याचा आग्रह केला. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपर्यंत भाजी बाजारात एकूण ४५० ट्रक टेम्पो भारुन भाजी आल्याने खरेदीदारांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र होते. या घाऊक बाजारात वाहने सोडताना त्यांच्यावर जंतुनाशक फवारणी करुन ती आतमध्ये सोडली जात होती मात्र खरेदीदारांनी तोंडावर रुमाल, मास्क आणि हात धुवून प्रवेश करण्याची एपीएमसीची सूचना खरेदीदारांनी धुडाकावून लावल्याचे दिसून येत होते. नवी मुंबईतील या भाजीच्या घाऊक बाजारात रात्री उशिरा आवक सुरू होते. पहाटे सहा ते सात वाजर्पेयत येथील भाजी विकली जाते. गुरुवारी रात्री बारानंतर भाजीच्या साडेचारशे ट्रक टेम्पो भरुन भाजी बाजारात आल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी आलेल्या विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतल्याचे दिसून येत नव्हते.

नियमांची पायमल्ली

एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक खरेदीदार, व्यापारी, अडते, दलाल,वाहतूकदार, माथाडी कामगार यांनी प्रवेशद्वारावर असलेले थर्मल चेक अप, जंतुनाशक औषध व मास्क लावून प्रवेश करावा अशी सूचना फलक लावले आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या घटकाला एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे पण पहाटे सुरु झालेल्या या बाजारपेठेने सर्वच नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र होते.