छापील किमतीपेक्षा महाग दराने खाद्यपदार्र्थाची विक्री

पनवेल : गुरुवारनंतर राज्य सरकार टाळेबंदी जाहीर करण्याच्या अफवेने पनवेलच्या रायगड बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पनवेलमध्ये सोमवार हा गर्दीचा दिवस ठरला.

पंधरा ते आठ दिवसांच्या खाद्यपदार्थ, भाजीपाला व किराणा माल भरणाऱ्यांची झुंबड झाल्याने मालाची आवक कमी असल्याचे कारण देत अनेक व्यापाऱ्यांनी छापील किमतीपेक्षा अधिकचे दर लावून खाद्यपदार्र्थाची विक्री केली.

पनवेलमधील विविध बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. कामोठे येथील सेक्टर २५ मध्ये सॅण्डवीच विक्रेता सुनील वाघमारे हे नियमितपणे खाद्यपदार्थ खरेदीसाठी रायगड बाजारात गेल्यावर नेहमीपेक्षा अधिक ग्राहकांची संख्या होती, परंतु ग्राहक वाढल्याने व बाजारातील माल संपल्याने ५६ रुपयांची छापील किमंत असलेला ब्रेड वाघमारे यांना ६० रुपयांना टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच घ्यावा लागला. वाघमारे यांना वेफर्सचे एक किलोग्रॅम वजनाचे पाकीट यापूर्वी १२० रुपयांना मिळत होते. सोमवारी व्यापाऱ्यांनी त्याच पाकिटाची किंमत दीडशे रुपये लावल्याचे वाघमारे यांनी सांगितले. शनिवार- रविवार बंद असल्याने रायगड बाजारात दिवसाला १२ ते १३ गाडय़ा भरून पालेभाज्यांची आवक झाली होती. शुक्रवारनंतर सोमवारी रायगड बाजार सुरू झाल्याने व सोमवार-मंगळवारनंतर टाळेबंदीची अफवा असल्याने बाजारात ७० गाडय़ा भरून पालेभाजींचा माल येऊनही सुमारे पाच हजार नागरिकांनी पालेभाजी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. दरदिवशी रायगड बाजारातील व्यवहार दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत संपतात मात्र ७० गाडय़ांमधील माल हातोहात विक्री झाल्याने दुपारी १२ वाजताच बाजार बंद झाला. बाजारात शिरण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत त्यावर नेहमी नियंत्रणासाठी रखवालदार असतात, मात्र गर्दीचे प्रमाण ध्यानात घेऊन बाजारातील चारही प्रवेशद्वारे उघडण्यात आली. मात्र नागरिकांच्या रांगा कल्पतरू गृहनिर्माण सोसायटीचा मार्ग, शेकाप कार्यालयापर्यंतचा मार्ग, पंचरत्न हॉटेलपर्यंतचा मार्ग, भारत गॅसचे दुकानार्प्यतचा मार्ग आणि उरण नाक्यार्प्यतचा मार्ग या सर्व मार्गावर नागरिकांनी रांगा लावून बाजारात खरेदीसाठी प्रवेश मिळविला. दररोज एक कोटी रुपयांपर्यंतच्या उलाढालीने सोमवारी दोन कोटी रुपयांर्प्यत मजल मारल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. रांगा लावून भाज्या खरेदी केल्याने अनेक किरकोळ पालेभाजी विक्रेत्यांनी चढय़ा दरात शहरी भागात भाजीपाला विक्री केल्याचे पाहायला मिळाले.