१२ कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : करोना संसर्गामुळे अचानक ओढवलेल्या वैद्यकीय आपत्तीत पालिकेची तिजोरी खाली होत असतानाच शहरातील काही बडय़ा उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करताना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)द्वारे विविध प्रकारचे मुखपटय़ा, जंतुनाशके, जीवरक्षक प्रणाली, अन्नधान्य, पीपीई अशा प्रकारच्या सुमारे १२ कोटी रुपये किमतीचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यात ऑनलाइन खेरदी विक्रीत अग्रेसर असलेली अ‍ॅमेझॉन, प्रसिद्ध बांधकाम कंपनी एल अ‍ॅन्ड टी, ल्युब्रिझॉल, सुल्झर यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीचादेखील समावेश आहे.

नवी मुंबईत दिवसेदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील बडय़ा रुग्णालयांना कोविडसाठी विशेष कक्ष सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. वाशी येथील पालिकेचे सर्वसाधारण रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात बदल करण्यात आला असून वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको प्रदर्शन केंद्रात एक हजार २०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. जवळपास सात हजार खाटा येणाऱ्या काळातील वाढीव रुग्णांसाठी तयार ठेवण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे. या सर्व रुग्णालयीन उभारणीमध्ये कोविड रोगाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या मुखपट्टी, जंतुनाशके, पीपीई किट, व्हेन्टिलेटर, सिलेंडर यासारख्या वैद्यकीय वस्तूंची पूर्तता सीएसआर योजनेद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. पालिकेने कोविडसाठी साठ कोटीपेक्षा जास्त रक्कम राखीव ठेवली आहे. यात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याबरोबरच वाशी येथील कोविड रुग्णालय उभारणीवर नऊ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली असून पुढील काळासाठी वीस कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयातील अंतर्गत बांधकामावरही पालिका खर्च करीत आहे. पालिकेच्या खर्चाबरोबरच सीएसआरद्वारे साहित्य स्वरूपात मदत मिळावी म्हणून पालिकेने प्रयत्न केले असून त्याला यश आले आहे. मागील तीन महिन्यांत शहरातील औद्योगिक वसाहतीतील कारखाने, तसेच काही वैयक्तिक मदत मिळाली आहे.

सीएसआरद्वारे मदत मिळविण्याचा पहिल्यापासून प्रयत्न केला गेला. त्यामुळे १२ कोटी रुपये खर्चाची मदत पालिका मिळवू शकली आहे. या उद्योजकांबरोबर संपर्क साधण्यासाठी पालिकेने वेगळा कक्ष उभारला असून कारखानदारांना आवाहन करण्यात आले आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका