पन्नास टक्के सवलत; महापौरांच्या हस्ते मंगळवारी शुभारंभ

पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सीटीस्कॅनसाठी आर्थिक भरुदड सहन करावा लागत होता. आता पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात याची व्यवस्था करण्यात आली असून मंगळवारी याचा शुभारंभ होणार आहे. ‘रुबी एआयएल केअर’ या संस्थेमार्फत ही तपासणी ५० टक्के सवलतीत करता येणार आहे.

पालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. या रुग्णालयावर आरोग्यसेवेची मोठी जबाबदारी असून सातत्याने रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. येथील रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून नेरुळ, ऐरोली, बेलापूर येथे माताबाल रुग्णालये करण्यात आली आहेत, मात्र तेथे फक्त बाह्य़रुग्ण तपासणी केली जाते. परिणामी याचा ताण वाशी रुग्णालयावर पडत असतो. औषधांबरोबर काही तपासण्यांचा भरुदडही रग्णांना सहन करावा लागतो. आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाच्या सीटीस्कॅन तपासणी पालिका रुग्णालयात होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भरुदड सहन करावा लागत होता. आता सवलतीत पालिका रुग्णालयात सीटीस्कॅन तपासण्या होणार आहेत.

पाच वर्षांचा करार

‘रुबी एआयएल केअर’ या संस्थेमार्फत या तपासण्या आता सवलतीत पालिका रुग्णालयात करण्याचे ठरविले आहे. याचा चांगला फायदा रुग्णांना होणार आहे. यावर रुग्णांना ५० ते ६० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. पाच वर्षांचा  करार केला असून प्रत्येक वर्षी यासाठी पुनर्परवानगी देण्यात येणार आहे. सामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांना या सेवेचा फायदा होणार असल्याची माहिती वाशी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात मंगळवारी सीटीस्कॅन सेवेला प्रारंभ होणार असून महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.    – डॉ. बाळासाहेब सोनावणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पालिका