शहरात मंगळवापासून नवे निर्बंध

नवी मुंबई : संचारबंदी काळात सोसायटी आवार वा इमारतीवर खासगी सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी सह अनेक निर्बंध लागू करण्यात आल्याचे परिपत्रक विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सहपोलीस आयुक्त जय जाधव यांनी जारी केले आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा अधिक वेगाने पसरणारा विषाणू आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मंगळवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासून  पोलीस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत.

यात सर्व प्रकारच्या आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी विरंगुळ्यासाठी फिरण्यावर बंदी, इमारतीच्या वा सोसायटीच्या गच्चीवर साजऱ्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना बंदी, धार्मिक उत्सव, अन्य कार्यक्रमांसाठी पोलिसांची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. नियमनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत विनाकामी फिरणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नाकाबंदीचे ठिकाणांवर बुधवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.

पहाटेच्या फेरफटक्यास मज्जाव

आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेकजण सकाळी फेरफटका मारण्यासाठी (मॉर्निग वॉक) बाहेर पडत असतात. अनेकजण पहाटे ४.३० वाजेपासूनच व्यायामाला किंवा चालायला सुरुवात करत असतात. संचारबंदीत या मंडळींनी बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.