02 June 2020

News Flash

एकही सांस्कृतिक व्यासपीठ नाही, एकमेव नाटय़गृह दुरुस्तीसाठी बंद

नवी मुंबईची भौगोलिक रचना ही एका उत्तर दक्षिण अशा सरळ रेषेत आहे. त्यामुळे ऐरोलीतील प्रेक्षक वाशी आणि वाशीतील प्रेक्षक बेलापूरात जाणे पसंत करीत नाही.

|| विकास महाडिक

वाशीतील एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असलेले विष्णुदास भावे नाटय़गृह आणखी काही माहिने प्रेक्षकांसाठी खुले होणार नाही. त्यामुळे नाटय़प्रेमी गेले सहा महिने नाटय़प्रयोगाशिवाय उपाशी आहेत. हे नाटय़गृह लवकर सुरू व्हावे यासाठी एकाही लोकप्रतिधिने आवाज उठविल्याची नोंद नाही. महानगर असलेल्या या शहरात आजच्या घडीस एकही सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध नाही. वाशीत सेक्टर सात मध्ये असलेले साहित्य मंदिर सभागृह आपल्या परीने ही चळवळ कायम ठेवण्याचे काम करीत आहे, मात्र त्यांना मर्यादा आहे. या सभागृहाशिवाय सांस्कृतिक चळवळ जिवंत राहावी यासाठी फारशी तळमळ लोकप्रतिनिधी पातळीवर होताना कधी दिसली नाही. सिडकोने वाशी येथे वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या भावे नाटय़गृहाची दुरवस्था झाल्याने ते पूर्णपणे दुरुस्तीस काढण्यात आले आहे. आधुनिक काळाबरोबर नाटय़गृहातील यंत्रणादेखील कालबाह्य़ झाल्या होत्या. त्या बदलल्या जाणार आहे. भावे नाटय़गृह तसा पालिकेचा पांढरा हत्ती मानला जातो. त्याच्या देखभाल, दुरस्तीवर पालिकेचे लाखो रुपये खर्च होतात. त्या बदल्यात येणारे उत्पन्न हे अगदीच तुटपुंजे आहे, पण ही एक सांस्कृतिक भूक असल्याने पालिकेने ती भागविणे आवश्यक आहे. भावे नाटय़गृहाच्या दुरुस्तीचा खर्च हा त्यांच्या बांधकामापेक्षा जास्त आहे. त्यामुळे येत्या काळात कात टाकलेले हे नाटय़गृह रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण हे नाटय़गृह दरुस्तीला पाच-सहा माहिने काढण्यापूर्वी शहरातील एखाद्या दुसऱ्या नाटय़गृहाचा विचार का गेला नाही. त्याला पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही. तो विचार करावा म्हणून एकाही लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव का टाकला नाही.

नवी मुंबईची भौगोलिक रचना ही एका उत्तर दक्षिण अशा सरळ रेषेत आहे. त्यामुळे ऐरोलीतील प्रेक्षक वाशी आणि वाशीतील प्रेक्षक बेलापूरात जाणे पसंत करीत नाही. त्यामुळे प्रत्येक दोन-तीन नोडसाठी एक छोटे सभागृह होणे आवश्यक होते पण तसे झालेले नाही. शहरात भावे नाटय़गृह वगळता दुसरे शासकीय नाटय़गृह नाही. नाटय़गृह ही वास्तू केवळ शासकीय संस्थांच्या माध्यमातून जपता येणारी आहे. वाशीला पर्याय म्हणून ऐरोली येथे दुसरे नाटय़गृह बांधण्याची निविदा प्रक्रिया गेली सहा वर्षे रखडली आहे. पहिल्यांदा ही निविदा काढून कामदेखील सुरू करण्यात आले. त्या कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने पायासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात आतापर्यंत तीन रहिवाशांनी जीव दिला आहे. नाटय़प्रयोगाअगोदरच या नाटय़गृहात आत्महत्येचे प्रयोग सुरू झाले आहेत. हे नाटय़गृह अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे. नाटय़गृहाची प्रेक्षकसंख्या आता वाढविण्यात आली आहे.

साडेपाचशे प्रेक्षक संख्येचे हे नाटय़गृह काही निर्मात्यांच्या सूचनेवरून तीनशे आसनांनी नंतर वाढविण्यात आले आहे. हे नाटय़गृहाची पहिली घंटा कधी वाजणार याबाबत ऐरोलीकरांना शंका आहे. अद्याप या नाटय़गृहाची एकही वीट रचली गेली नाही. सिडकोच्या वतीने नेरुळ येथे बांधण्यात आलेले आगरी कोळी सांस्कृतिक भवन हे नावालाच आता सांस्कृतिक राहिले असून ते आता विवाह सोहळ्यासाठीच जास्त वापरले जात आहे. वास्तविक छोटे आणि वर्दळीपासून एका बाजूला असलेल्या या सांस्कृतिक भवनात नाटय़प्रयोग होणे गरजेचे होते, पण त्यासाठी सिडको अथवा एखाद्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हे भवन आता अडगळीत पडले आहे. या ठिकाणी आगरी कोळी संस्कृती जपण्याचाही प्रयत्न येथील नेत्यांनी केला नाही. सिडकोच्या मागे लागल्याशिवाय सहज काही मिळत नाही असा पूर्वानुभव आहे पण त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भासते.

सिडकोचे प्रदर्शन केंद्र असून नसल्यासारखे

वाशी येथील सिडकोच्या पदर्शन केंद्रातील नाटय़गृह त्यांच्या शुल्कामुळे असून नसल्यासारखे आहे. बेलापुरात आर्टिस्ट व्हिलेज नावाची एक वसाहत आहेत. काही कलाकार या ठिकाणी राहतात व आपली सांस्कृतिक चळवळ मुंबईला जाऊन जपत असल्याचे दिसून येते. मात्र नवी मुंबईत सांस्कृतिक चळवळ कायम राहावी यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सिडकोने केवळ सिमेंटचे जंगल उभे करताना येथील सांस्कृतिक भूक भागविण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच नवी मुंबईत काळा घोडासारखा आठवण राहील असा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसत नाही.

केवळ इमारतींचा देखावा

नवी मुंबईतील आगरी कोळ्याची संस्कृती ही एक लक्षवेधी विषय आहे पण ज्यांच्या जमिनींवर हे शहर वसले आहे त्या भूमिपुत्रांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. केवळ इमारती बांधून संस्कृती जपता येत नाही. त्यासाठी ठाणे, पुणे, मुंबईमधील लोकांसारखी आत्मिक तळमळ लागते. ती नवी मुंबईकरांच्यात नाही.

अपेक्षा आमच्या

व्यसनाधीनतेबाबत स्पष्ट भूमिका हवी

तोंडाच्या कर्करोग रुग्णांच्या संख्येबाबत जगात भारताचा पहिला नंबर आहे. भारतात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दररोज २ हजार ७०० पेक्षा अधिक लोकांचे मृत्यू होत आहेत. देशात दररोज नव्याने ५ हजार ५०० मुले नव्याने तंबाखू सेवन करत आहेत, असे गंभीर चित्र समोर असताना हा विषय ना लोकसभा निवडणुकीत ना विधानसभा निवडणुकीत कोणी उचलतो. राजकर्त्यांनी याचं भान ठेवायला हवं. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांनीही याबाबत सजगता दाखवायला हवी. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ प्रॉडक्ट्स अ‍ॅक्ट २००३ मध्ये अमलात आला असूनही शाळेच्या आवारात पान, तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला मनाई आहे. मात्र अभावानेच कारवाई होते. त्यामुळे उमेदवार व राजकारणी संवेदनशील असायला हवेत. नवी मुंबई स्वच्छ व चकाचक असताना शहरातील झोपडपट्टीमध्ये मात्र एक रुपयात व्यसनाचे विविध प्रकार बळावत आहेत. ते समाजाला व तरुणाईसाठी घातक आहे. त्यामुळे याबाबत उमेदवार व राजकारण्यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवून याबाबत आवाज उठवत ठोस धोरण घ्यायला हवे.

– डॉ. अजित मगदूम, संचालक, अन्वयव्यसन मुक्ती केंद्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 3:43 am

Web Title: cultural platform theater for repairs akp 94
Next Stories
1 आरोग्य व्यवस्था बदलण्यासाठी रिक्षाचालकाची उमेदवारी
2 मुलाच्या कामांवर वडिलांची परीक्षा
3 ‘एपीएमसी’मध्ये कांद्याची आवक निम्यावर असूनही दरघसरण
Just Now!
X