नवी मुंबई म्युझिक अ‍ॅंड ड्रामा सर्कल, वाशी

सिडकोने नवी मुंबई शहर वसवले, मात्र अन्य शहरांप्रमाणे साहित्य संस्कृती जोपासणाऱ्या संस्था या शहरात नव्हत्या. नवनवीन संस्था स्थापन होत गेल्या आणि शहरात सांस्कृतिक चळवळीची पाळेमुळे पसरू लागली. नवी मुंबईत नाटय़, नृत्य, संगीताची जोपासना करणाऱ्या सुरुवातीच्या काळातील काही संस्थांपैकी एक म्हणजे वाशीतील म्युझिक अँड ड्रामा सर्कल. आज ही संस्था शहरातील एक महत्त्वाचं सांस्कृतिक व्यासपीठ ठरली आहे.

उदयोन्मुख आणि होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुरलीधर चिम्मलगी आणि त्यांच्यासारख्याच काही कलाप्रेमी मंडळींनी १९७५मध्ये वाशीत म्युझिक अँड ड्रामा सर्कलची स्थापना केली. तेव्हा शहरात मनोरंजनाची साधने नव्हती. रेडिओही दुर्मीळ असे. वसाहतनिर्मितीसाठी भौतिक सुविधांबरोबर गरज असते ती आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजनाच्या दर्जेदार साधनांची.

सिडकोने शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी व कलेचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी समाजसेवा विभागाची स्थापना केली. कला, साहित्य, वाचन, नाटय़, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी हौशी नागरिक एकत्र येऊ  लागले. तेव्हा ज्या संस्था निर्माण झाल्या त्यात ही संस्था अग्रेसर होती. सुरुवातीला वाशी सेक्टर १ मधील समाजमंदिरात संस्थेचे विविध कार्यक्रम होत. सेक्टर १मधील समाजमंदिरात १९८१ पासून संस्थेने वसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात नावाजलेल्या साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली जात.

सुरुवातीला अमोल पालेकर यांच्या विविध नाटकांचे आयोजन केले. १९८६ला संगीत, अभिनय, नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी राज्यभरातील कलाकारांसाठी तीन दिवसीय संगीत संमेलन भरवले जाऊ लागले. सुगम संगीत, नाटक स्पर्धा घेण्यात येऊ लागल्या. याच स्पर्धातून दिग्दर्शक, कलाकार तयार झाले. या नाटकांसाठी प्रकाशव्यवस्था, नेपथ्य सर्व काही संस्थेचीच कलाकार मंडळी करत. त्यातून कला क्षेत्रात नवी उमेद निर्माण झाली. सुरुवातीला ६० प्रेक्षक बसतील असे नाटय़गृह बांधण्यात आले. त्यातून अनेक कलाकार पुढे आले. त्यानंतर ‘रूम थिएटर’ या संकल्पनेवर संस्थेत येणाऱ्या मुलांना एकांकिका, नाटय़लेखन, दिग्दर्शन, अभिनयाचे धडे दिले जाऊ लागले.

सध्या संस्थेतर्फे दर महिन्याला तीन एकांकिका सादर केल्या जातात. त्यातून कलेची जोपासना होतानाच नव्या होतकरू कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. कवितांचे कार्यक्रम सादर केले जातात. कविता लेखन, सादरीकरण, चाल लावून गायन या उपक्रमांतून कवी घडवले जात आहेत. वाचनसंस्कृतीसाठी ‘सांगाती’ उपक्रम सुरू केला.

संगीत, अभिनय, नृत्य तसेच कलेच्या विविध क्षेत्रांसंदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेद्वारे दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक कलावंत विवेक भगत असून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने नवी मुंबईत ही संस्था विविध कलांना प्रोत्साहन देत आहे. संस्थेचे ४०० सभासद असून शास्त्रीय गायन व सुगम संगीत स्पर्धा, संगीत, नाटय़, नृत्य, योगासने, अ‍ॅरोबिक्स, पाश्चिमात्य नृत्य प्रकार, स्केटिंगचे प्रशिक्षण अत्यल्प दरात दिले जाते.

संस्थेने पं. सी. आर. व्यास, भीमसेन जोशी, माणिक वर्मा, प्रभाकर कारेकर, सुहास व्यास, जयमाला व कीर्ती शिलेदार, संजीव चिम्मलगी, अश्विनी भिडे देशपांडे, अंजनी आंबेगावकर, अजय पोहनकर, शंकर महादेवन कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटय़क्षेत्रातील दिग्गजांनी संस्थेद्वारे कार्यक्रम सादर केले आहेत. कला निर्मिती व कलेची जोपासना हीच संस्थेची उदिष्टे आहेत.

वैविध्यपूर्ण नाटय़निर्मिती

संस्थेद्वारे विविध मराठी, हिंदी, संगीत नाटकांची निर्मिती केली असून संस्थेने सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नाटककार व दिग्दर्शक अ‍ॅन्थॉन चेखाव यांच्या प्रपोजल, अ‍ॅनिव्हर्सरी या इंग्रजी नाटकांची निर्मिती केली आहे. त्यामध्येही स्थानिक कलाकारच अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशव्यवस्था अशी सर्वच प्रकारची जबाबदारी सांभाळत आहेत. संस्थेच्या विविध नाटकांना राज्य नाटय़ स्पर्धेत गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार आणि गौरव

संस्थेने १५० नाटकांची निर्मिती केली आहे. १९८३ पासून संस्था महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत सातत्याने सहभाग घेत आहे. संस्थेने सादर केलेले पहिले नाटक ‘राजा एडिपस’ हे होते. नाटय़ स्पर्धेत मराठी, हिंदी, संगीत नाटकांचा समावेश असून अनेक वेळा सर्वोत्कृष्ट नाटय़निर्मितीची प्रथम क्रमांकाची पारितोषिके संस्थेने जिंकली आहेत. संस्थेच्या अनेक कलाकारांना अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीताच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.