जुन्याच नोटा अद्याप व्यवहारात

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने नागरिकांना दैनंदिन व्यवहारातील अडचणींना सामोरे जावे लागत असून याचा फटका आता उरणमधील मासेमारी तसेच विक्री व्यवसायालाही बसू लागला आहे. त्यामुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज लाखो रुपयांचा रोखीने व्यवसाय करावा लागत असल्याने रोखीच्या व्यवहारासाठी जुन्याच नोटांतून व्यवसाय करावा लागत आहे. तर बाजारात मासळीची किरकोळ विक्री करीत असताना ग्राहकांकडून पाचशेच्या नोटा मिळत असल्याने विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे मासळी वाया जाऊ लागली आहे.

सरकारने चलनातील पाचशे आणि एक हजारांच्या नोटा रद्द केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बंद करण्यात आलेल्या नोटा बदलण्यासाठी तसेच त्या बँकेतील खात्यावर जमा करण्यासाठी रविवारी रांगाच रांगा लागल्या होत्या. तर एटीएम सुरू झाल्याने रात्री १ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगा लावून पैसे काढले.

यात भर म्हणूून रविवार असूनही मासळी बाजारात सुट्टे पैसे नसल्याने अनेक खवय्यांना मासळीविनाच हा रविवार घालवावा लागला. पारंपरिक मासेमार सकाळी पहाटे तीन वाजता जाऊन आठ ते नऊ वाजेपर्यंत बंदरावर येतात. या मच्छीमारांनी पकडलेल्या मासळीचा बंदरावरच लिलाव केला जातो. त्यासाठी रोख रक्कम द्यावी लागते. मात्र चलनातील नोटाच रद्द झाल्याने या व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती संतोष नाखवा यांनी दिली.

मासळी घेऊन बाजारात आल्यानंतर सुरमई, पापलेट, घोळ आदी मासळीचे दर चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत जात असल्याने ग्राहक जुन्या नोटा देऊ लागले असल्याची माहिती रूकमा कोळी यांनी दिली. या नोटांचं आम्ही काय करायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मासळी विक्रीवरही परिणाम झाला आहे.

बोटी बंदरात 

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींसाठी लाखो रुपयांचे इंधन लागते. त्यासाठी काही ठिकाणी नोटा घेत असले तरी त्यांची मुदत संपल्यानंतर व्यवसाय कसा करायचा असा सवाल विनायक पाटील यांनी केला आहे. तर या निर्णयाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला असून अनेकांनी बोटी बंदरात नांगरून ठेवणे पसंत केल्याची माहिती मच्छीमारांचे नेते सीताराम नाखवा यांनी दिली. तसेच रोखीच्या व्यवसायासंदर्भात सरकारने योग्य तो निर्णय घेण्याचीही मागणी त्यांनी केली.