नेरुळमध्ये पथदर्शी प्रकल्प; पामबीच मार्गालगत समांतर रस्त्यावर नियोजन

शहरांतर्गत वाहतुकीसाठी पालिकेतर्फे सुरू केलेल्या जनसायकल प्रणालीला नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेरुळमध्ये या सायकल वापराचे प्रमाण जास्त आहे. मात्र या सायकल रस्त्यावर चालविणे धोक्याचे असल्याने स्वतंत्र सायकल ट्रॅकची गरज आहे. यासाठी पालिकेने नेरुळमध्ये पामबीच मार्गालगत सायकल ट्रॅक उभारण्याचे ठरविले आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून पुढील काळात इतर विभागातही तसे नियोजन करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेने नोव्हेंबर महिन्यात ही जन सायकल प्रणाली सुरू केली. त्याला नवी मुंबईकर अधिक पसंती देत आहेत. शरीर आरोग्यदायी, तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकल वापरत आहेत. तरुण, ज्येष्ठ नागरिक नित्याने विशेषत: सकाळी, सायंकाळी आणि रात्री शारीरिक व्यायामासाठी सायकलिंग करीत आहेत.

मात्र या सायकल रहदारीच्या रस्त्यावर वापराव्या लागत असल्याने धोक्याचे ठरत आहे. यासाठी स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही नागरिकांकडून मागणी होत आहे. याचा विचार करीत पालिकेने सायकल ट्रॅकचे नियोजन ठरवले आहे.

या सायकल ट्रॅकचा पथदर्शी प्रकल्प नेरुळ-सारसोळे जंक्शन ते वजराणी या पामबीच मार्गाला समांतर रस्त्यावर करण्यात येत आहे. अंदाजे दीड मीटरच्या पट्टय़ात हा सायकल ट्रॅक बनवला जाणार असून त्या ठिकाणी सायकल चालवता येणार आहे.

या सायकल ट्रॅकवर हिरव्या रंगाचा पट्टा तयार करण्यात येणार असून या सायकल ट्रॅकवर सायकलचे चित्र रेखाटले जाणार आहे. या सायकल ट्रॅकचा नियमित रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. इतर विभागतही आशा सायकल ट्रॅकचे पालिकेचे नियोजन आहे.

सायकलच्या २,४५,२६४ फेऱ्या

नाव्हेंबर ते फेब्रुवारी या सात महिन्यात ‘युलू’ सायकलचा मोठा वापर होत आहे. ७१ हजार ६८१ जणांनी सायकलचा वापर केला असून २ लाख ४५ हजार २६४ फेऱ्या झाल्या आहेत. आतापर्यंत ८ लाख ५८ हजार १७५ किलोमीटपर्यंत या सायकल नागरिकांनी चालविल्या आहेत.

टप्प्याटप्प्याने विविध विभागांत सायकल ट्रॅक तयार करण्यात येतील. ट्रॅकसाठी आरेखनही करण्यात आले आहे. नेरुळ येथून या कामाला सुरुवात होत आहे.

-डॉ.रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली जनसायकल योजना ही उपयोगी आहे. याचा व्यायाम म्हणूनही चांगला वापर होत आहे. मात्र, रस्त्यावर सायकल चालविणे धोक्याचे आहे.

– माया पांगूळ, रहिवासी, वाशी