देवघरातील दिव्याने पेट घेतल्याने दुर्घटना

पनवेल : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १६ येथील डिम्पल ओरगीन या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत बुधवारी रात्री साडेआठ वाजता घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसून सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.

संबंधित सदनिकेतील कुटुंब सायंकाळी घराबाहेर गेले असताना देवघरातील दिव्याने पेट घेतला. या दरम्यान सदनिकेच्या गॅलरीत ठेवलेल्या सिलेंडरने पेट घेतल्याने ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. स्फोट झालेल्या सदनिकेला कुलूप लावले असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सदनिकेचे कुलूप जवानांना तोडावे लागले.

स्फोटाची माहिती मिळताच नगरसेवक अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची वीज बंद केल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या स्फोटात संबंधित सदनिका जळून खाक झाली. तसेच स्फोटानंतर अनेक तास डीम्पी ओरगीन या इमारतीचे नागरिक स्वत:च्या घरातील वीज व्यवस्था सुरू न झाल्याने घरात जाण्यासाठी धास्तावले होते.

‘अत्यावश्यक असल्यासच घरगुती गॅसचा दुसरा सिलिंडर घरी ठेवा’

पनवेल : कळंबोली वसाहतीमध्ये बुधवारी रात्री साडेआठ वाजता सेक्टर १६ येथील डिम्पी ओरगीन या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच घबराट पसरली. मात्र हा स्फोट घरात ठेवलेल्या दोन सिलिंडरमुळे झाल्याने अत्यावश्यक असल्यासच एका घरात दोन सिलिंडर बाळगा असे आवाहन सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केले आहे.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १६ येथील डिम्पी ओरगीन या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील राहणारे अमितकुमार शर्मा यांच्या घरात ही घटना घडली. अमित हे त्या वेळी कामावर गेले होते. सायंकाळी घरातील दिवाबत्ती करून त्यांच्या पत्नी व मुलगा घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर गेल्यानंतर ही घटना घडली. घरातील स्वयंपाकगृहात एक सिलिंडर भरलेला होता. तसेच खिडकीच्या गॅलरीत आणखी एक सिलिंडर ठेवला होता. खिडकीच्या शेजारीच देवघर असल्याने प्रथम दिव्याची आग घरभर पसरली आणि सिलिंडरमधून एलपीजी वायुगळती होत असल्याने हा स्फोट झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.