नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या ३६ हजार पार झाली असून फक्त ४७० अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक खाटा कमी पडत आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने नेरुळ येथील डॉ. डी.वाय पाटील रुग्णालयात अतिदक्षता खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत मंगळवापर्यंत ३६ हजार २५७ करोनाबधित झाले असून आतापर्यंत ७४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३ हजार ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसाला करोना बाधितांचा आकडा हा साडेतीनशेच्या घरातच आहे. पालिका प्रशासनाकडे साध्या व प्राणवायू असलेल्या खाटांची संख्या पुरेशी आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी असलेल्या अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा या कमी पडत आहेत. मात्र, पालिकेच्या डॅशबोर्डवर खाटा शिल्लक असल्याचे दिसत होते. मात्र दोन तीन दिवसांपासून खाटांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयाशी करोना उपचाराबाबत करार केली असून या ठिकाणी १०० अतिदक्षता खाटा व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा सध्या उपलब्ध आहेत. यात आणखी १०० अतिदक्षता व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे. डॉ.डी. वाय पाटील रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल पेड्डेवाड यांनीही दुजोरा दिला आहे.

मागील आठवडय़ात या खाटांची मागणी कमी होती. परंतु दोन दिवसांपासून मागणी वाढली आहे. डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात १०० अतिदक्षता व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांची वाढ होईल. याबाबतचे साहित्यही प्राप्त झाले आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका