नवी मुंबईतील करावे गावात गेल्या काही दिवसांपासून डान्सबार सुरू आहे. मालवणी बार व रेस्टॉरन्टला डान्स बारचे रूप आले आहे. या विरोधात मंगळवारी ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि डान्स बारला प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला.

गणपतशेठ तांडेल मैदानाकडून तलावाजवळून गावात जाताना सुरुवातीलाच मालवणी बार व रेस्टॉरन्ट आहे. तिथे गेल्या काही दिवसांपासून डान्स बार सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे करावे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. या बारच्या समोरच एनएमएमटीचा बसथांबा आहे. अनेक ग्रामस्थ याच बसथांब्यावरून बस पकडतात. याच बारच्या समोर महापालिकेचा मासळी बाजार आहे. त्यामुळे मासे घेण्यासाठी येणाऱ्या महिलांची तिथे गर्दी असते. बारच्या मागे ज्ञानदीप शाळा आणि तिथून काही अंतरावर महापालिकेची शाळा आहे. त्यामुळे डान्सबार बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मंगळवारी या डान्स बारच्या विरोधात ग्रामस्थांनी महापालिकेच्या शाळेत बैठक आयोजित केली होती.

याबाबत शिवसेनेचे विभागप्रमुख सुमित्र कडू यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, ठाणे जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक, तसेच एनआरआय पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करून येथील डान्स बार तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

गावातील तरुणांनी समाजमाध्यमांवर ‘करावेच्या वेशीवर डान्सबार’ संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.  ‘मालवणी किनारा येथे सुरुवातीला रेस्टॉरन्ट होते. त्यानंतर तिथे बार, नंतर लेडीज बार, त्यानंतर ऑर्केस्ट्रा बार व आता डान्स बार सुरू झाला आहे. गावात प्रवेश करण्याच्या ठिकाणीच हा बार आहे. याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये यासाठी पोलिसांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी’ अशी मागणी विभागप्रमुख सुमित्र कडू यांनी दिली.

डान्स बारला विरोध करण्यासाठी युवकांची बैठक झाली आहे. त्या बैठकीला मी उपस्थित होतो. या डान्स बारला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक

करावे गावातील मालवणी किनारा या ठिकाणी डान्स बार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कोणतेही बेकायदा कृत्य सुरू असेल, तर कडक कारवाई करण्यात येईल.

सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १    

मालवणी किनारा येथे डान्स बार सुरू करण्यात आलेला नाही. चुकीचा संदेश पसरविण्यात येत आहे. येथे १९९० पासून लेडीज सव्‍‌र्हिस बार सुरू आहे. तेव्हा विरोध झाला नव्हता. आता सर्व विभागांच्या रीतसर परवानग्या घेऊन ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात येणार आहे. ऑर्केस्ट्रा बारची परवानगी अंतिम टप्प्यात आहे.

सुधाकर हेगडे, बारमालक

मालवणी किनारा येथे डान्स बार सुरू झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. मंगळवारी युवकांची बैठक झाली. सर्व ग्रामस्थांची ग्रामसभा बोलावण्यात येईल. त्यात सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक