वाढत्या जलप्रदूषणामुळे मासेमारीचे प्रमाण अवघे २० ते ३० टक्क्यांवर

नवी मुंबई : पाण्यातील वाढत्या जलप्रदूषणामुळे नवी मुंबईच्या खाडीतील मासेमारी धोक्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एमआयडीसी आणि सिडको येण्याअगोदर नवी मुंबईतील सर्वच गावातील ग्रामस्थ मासेमारीचा व्यवसाय करत होते. मात्र, एमआयडीसीमधून रसायनयुक्त पाणी सोडल्याने माशांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत चालली आहे.

सुरुवातीला एमआयडीसीने आणि नंतर सिडकोने नवी मुंबईतील भूमिपुत्रांची १००टक्के जमीन संपादित केल्यानंतर काही गावांतील खाडीकिनारे बाधित झाल्याने मासेमारीचा व्यवसाय बंद झाला. त्यात दिवाळे गाव, सारसोळे गाव, वाशी गाव, तळवळी आणि दिवा गाव अशा मोजक्या गावांशेजारीच खाडीकिनारे शिल्लक राहिले असले तरी आजुबाजूच्या रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे खाडीतील नैसर्गिक जीवसृष्टीवर गंभीर परिणाम झाला आहे.

एमआयडीसीचे सांडपाणी सोडणारे सर्व नाले हे खाडीला मिळालेले आहेत. रासायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने ते पाणी सरळ खाडीत येत असल्याने खाडीतील जलप्रदूषण वाढत आहे. त्यातच खाडीत दिवसेंदिवस गाळाचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम खाडीकिनारी प्रजननासाठी येणाऱ्या मासळीवर होत आहे. जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.

या सर्व प्रकाराचा थेट परिणाम येथील पारंपरिक मासेमारीवर होऊन ती २० ते ३० टक्क्य़ांवर आली असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले. दरम्यान, रासायनिक कंपन्यांनी पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सोडावे जेणेकरून पाण्यातील जलप्रदूषण कमी होईल, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.

मच्छिमारांकरिता आधुनिक उपाययोजना व्हावी अशी मागणी होत आहे. नवी मुंबई शहरात नवनवीन जलवाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन प्रकल्प सुरू होणार आहेत. यामध्ये नेरुळ येथून रोप-वे सेवा, वाशी येथून शिवडी न्हावाशेवा ब्रिज त्यामुळे मासेमारीवर याचा परिणाम होणार आहे असे मत स्थानिक मच्छीमार व्यक्त करीत आहेत. या भविष्यातील संकटामुळे मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे मासे विक्रीचा थेट पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

प्लास्टिकच्या प्रदूषणाचे संकट

जलप्रदूषणाबरोबर खाडीत वाढणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे देखील मासेमारीवर नवे संकट ओढवले आहे. जेव्हा हे मच्छीमार मासेमारीसाठी आपली जाळी खाडीतील पाण्यात टाकतात तेव्हा मासळीऐवजी प्लास्टिकच या जाळ्यात जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे ही जाळी खराब होऊन त्याचा भुर्दंड या मच्छीमारांना बसतो.

खैरणे एमआयडीसीमधील काही ठिकाणी कंपनीची पाइपलाइन फुटलेली आहे, त्याचबरोबर चेंबरमध्ये गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत एमआयडीसीला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच काही कंपन्यांवर कारवाईदेखील करण्यात येत आहे. – डॉ. एस. पी. गंधे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, नवी मुंबई

 

खाडीत अधूनमधून रासायनिकमिश्रित पाणी येत असते. त्यावेळी पाण्याचा रंग देखील बदलतो. रसायनमिश्रित पाणी आल्याने खाडीत दोन ते तीन दिवस मासळी नसते. परिणामी आम्हाला रिकाम्या हाती परतावे लागते. एमआयडीसीतून सोडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून सोडणे गरजेचे आहे. – मनोज मेहर, स्थानिक मच्छीमार