धोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी पर्यायी निवाराच नाही
शासन आदेशानुसार केवळ वर्षांला धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून हात वर करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने यंदाही अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरांची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. दोन वर्षांपूर्वी नेरुळ येथील एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील रहिवाशांना जवळच्या शाळेत हलविण्यात आले होते. यंदाही धोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी ही शाळा हे एकमेव आश्रयस्थान ठरण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेने वर्ष २०१७-१८ची धोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली. यात ३१५ इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. ५३ इमारती अतिधोकादायक आहेत. यातील काही इमारतींतील रहिवाशांची पाणी व वीजजोडणी खंडित करण्यात आली आहे. धोकादायक इमारतींत रहिवाशांना राहू नये यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत, पण रहिवासी इमारत सोडण्यास तयार नाहीत. अशा वेळी जोरदार पावसात इमारत कोसळल्यास तेथील रहिवाशांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नाही. पालिकेने २५ वर्षांत अशी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे नवी मुंबईत इमारत कोसळल्यास रहिवाशांसमोर परिसरातील पालिका शाळा हा एकच पर्याय आहे. नवी मुंबईतील अनेक इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे विकासकांनी पुढाकार घेतला आहे. ज्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरूच झालेली नाही, अशा इमारती कोसळल्यास रहिवाशांना कोणीही वाली नाही.
मुंबई, ठाण्यात अशा इमारतींतील रहिवाशांना एमएमआरडीए किंवा म्हाडाची घरे भाडय़ाने उपलब्ध करून दिली जात आहेत, मात्र नवी मुंबईत आता पालिका क्षेत्रात सिडकोची घरे शिल्लक नसल्याने या रहिवाशांना स्वस्तात भाडय़ाची घरे मिळणे मुश्कील झाले आहे.
अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार
शहरातील धोकादायक इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली असून यातील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा येत्या ७ दिवसांत खंडित करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात विविध प्रकारच्या एकूण ३१५ इमारती धोकादायक असून त्यापैकी ५४ इमारती या अतिधोकादायक स्थितीत आहेत.
महापालिका क्षेत्रात बेलापूरपासून दिघ्यापर्यंत सर्वच नोडमध्ये धोकादायक इमारती आहेत. त्यात महापालिकेच्या वास्तूंचाही समावेश आहे; परंतु त्या बाबत महापालिकेनेही काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यात शहाबाज गावातील मनपा कर्मचारी निवासस्थान, सीबीडी सेक्टर १२ येथील पंपहाऊस, तुर्भे येथील माता बाल रुग्णालय यांचा समावेश आहे. वाशी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे कर्मचारी निवासस्थान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी निवास्थान, शहरारातील आद्ययावत मनोरंजान केंद्र, मघदूत टॉकीज यांसह वाशीतील बहुचर्चित जे एन वन व टू मधील इमारतींचाही समावेश आहे.
संरचनात्मक दुरुस्ती करणे, इमारत रिकामी न करता ती दुरुस्त करणे व किरकोळ दुरुस्ती करणे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या अतिधोकादायक इमारतींचा वापर त्वरित थांबविणे आवश्यक आहे, मात्र पालिका गेल्या काही वर्षांपासून रहिवाशांना केवळ नोटीसा बजावत आहे. रहिवासीही या नोटिसांना केराची टोपली दाखवत आहेत.
अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई येत्या ७ दिवसांत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 1:51 am