रस्त्यात बेकायदा पार्किंग; फटाके, आतिषबाजीमुळे पेट घेण्याची भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घणसोलीतील डी मार्ट परिसरातील सीएनजी गॅस पंप ते गुणाली तलावादरम्यान रस्त्यालगत ज्वलनशील वायूचे टँकर अनधिकृतरीत्या उभे करण्यात येत आहेत. या रस्त्यावरून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जातात. फटाके, आतिशबाजी यामुळे वायूने पेट घेतल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनधिकृत पार्किंगवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

घणसोली डी मार्ट येथील रस्ता हा घणसोली विभागातील मुख्य रस्ता आहे. त्यामुळे तो नेहमीच गजबजलेला असतो. सध्या गणेशोत्सव असल्याने या परिसरातील बहुतेक विसर्जन मिरवणुकाही याच रस्त्यावरून काढल्या जातात. गुणाली तलावाच्या दिशेने जाण्यासाठी याच रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. येथूनच सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरणुका निघतात. या मिरवणुकांत फटाक्यांची जोरदार आतिशबाजीही केली जाते. गुणाली तलाव ते सीएनजी पंपादरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा रासायनिक द्रव्य व अतिज्वलनशील वायू भरलेले टँकर उभे असतात. फटाक्यांची ठिणगी रस्त्यालगत उभ्या केलेल्या वायू टँकरवर पडल्यास शहारत मोठी दुर्घटना घडू शकते. आजूबाजूला गजबजलेला परिसर व मोठय़ा इमारतीही आहेत. दुर्घटना घडली तर येथील नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बेकायदा पार्किंगवर कारवाईची मागणी होत आहे.

या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचे अधिकार पालिकेकडे नाहीत. याबाबत पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

– दत्तात्रेय नागरे, साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभाग अधिकारी, घणसोली

याआधीही या टँकर पार्किंगवर कारवाई केली आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनात कारवाई करण्यास अडचणी होत्या. लवकरच कारवाई करण्यात येईल.

– सचिन खोदरे, साहाय्यक निरीक्षक, वाहतूक विभाग, कोपरखैरणे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous gas tanker in ghansoli
First published on: 20-09-2018 at 03:43 IST