काही ठिकाणी तडे ;  दुचाकी व जनावरांचाही वावर

सीमा भोईर, पनवेल</strong>

जलद व सुरक्षित प्रवासासाठी निर्माण झालेल्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवास धोकादायक ठरू शकतो. या मार्गावरील ८ हजार पॅनल खराब झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले असून त्यांची दुरवस्था वाढली आहे. कळंबोलीपासून खालापूर टोलनाक्यादरम्यान या रस्त्याला काही ठिकाणी तडेही गेलेले दिसत आहेत. दुचाकी व जनावरांचाही वावर वाढला आहे.

मुंबई व पुणे या दोन शहरांना जोडणारा ९४.५ किलोमीटर लांबीचा हा देशातील पहिला नियंत्रित प्रवास असलेला महामार्ग. अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या या मार्गावरून सुसाट व वेगाने प्रवास करता येतो. पण अपघातांमुळे हा महामार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. घाटात दरड कोसळण्याच्या घटना तसेच कुंपन तोडून महामार्गावर प्रवेश यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता यात भर पडत आहे ती रस्त्याच्या दुरवस्थेची.

मुंबईकडून कळंबोलीपासून हा रस्ता सुरू होता. मात्र पनवेलजवळील शेंडुग फाटा व खालापूर दरम्यान काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रीटीकरणाला तडेही गेले आहेत. त्यामुळे भरधाव गडीचे टायर फुटून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मोकाट जनावरेही मध्ये येत आहेत. या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांना टँकरने पाणी घातले जाते. मात्र हे टँकर रस्त्यात उभे केले जात असल्याने धोका वाढला आहे. दुचाकींना प्रवेश नसताना स्थानिक या मार्गावर दुचाकी घालत जीव धोक्यात घालत आहेत. रस्ते विकास महामंडळाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

रात्रीच्या वेळी जड वाहनांचा अडथळा

या महामार्गावर इतर वाहनांबरोबर मालवाहू वाहनेही ये-जा करतात. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाताना खालापूर टोलनाक्यापासून रात्री ११ नंतर मोठय़ा प्रमाणात या वाहनांचा प्रवास सुरू होतो. मात्र जड वाहनांनी एका लेनमधून जाणे अपेक्षित असताना घाटात ही वाहने सर्वच लेनमधून धिम्या गतीने जात असतात. त्यामुळे लहान वाहनांना जागा शोधत मार्ग काढावा लागत आहे.

कळंबोलीपासून ते पुण्यापर्यंत द्रुतगती महामार्गावर सुमारे ८ हजार पॅनल खराब झाले आहेत, असे सर्वेक्षणात आढळले आहे. ते बदलायचे आहेत. त्याची निविदा काढण्यात येईल. तोपर्यंत ‘आयआरबी’ला डांबराने खड्डे भरून घेण्यास सांगितले जाईल. ज्या ठिकाणी कुंपण तुटली आहेत, ती बसविण्यात येतील.

-राजेंद्र यादव, स्वतंत्र अभियंता, द्रुतगती महामार्ग

टँकरने झाडांना पाणी देताना ते रस्त्यावर थांबवले जातात. त्यामुळे वेगाने येणारे वाहन धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने याकडे लक्ष घालावे.

-प्रशांत रणवरे, प्रवासी

आयटीएमएसचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होणार आहे. स्थानिक महामार्गावरील कुंपण तोडत असल्याने जनावरे रस्त्यावर येत असतात. महामार्ग पोलिसांच्या मदतीने रस्ते विकास महामंडळ त्यांच्यावर कारवाई करेल.

-नम्रता रेड्डी, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ