ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. काम अर्धवट अवस्थेत असल्याने रस्ता जीवघेणा झाला आहे. अंरुद असलेल्या रस्त्यांच्या या ठिकाणी पडलेल्या खड्डय़ामुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहे. दररोज किमान सहा ते सात जण वाहने घसरून जखमी होत असल्याची परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालावी लागत आहे. दिघा येथे रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अरुंद रस्त्यांच्या ठिकाणी तीन वर्षांत पाच ते सहा जणांचा बळी गेला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील या रस्त्याच्या खालून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. मात्र तिला गळती लागल्याने त्याचे पाणी ठाणे-बेलापूर मार्गावरील अरुंद रस्त्यावर साचते. साचत असलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने वाहने खडय़ात पडून, घसरून अपघात होण्याच्या घटना घडत आहे अशी माहिती येथील रहिवासी राकेश मोकाशी यांनी दिली. तरी या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव यांच्याशी संपर्क साधला असता परिस्थितीची जाणीव असल्याची कबुली त्यांनी दिली असून संबधित विभागाला खड्डे बुजवण्याचे सांगण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.