News Flash

जीर्ण दीपस्तंभांमुळे पामबीच धोक्यात

बेलापूर ते वाशी हा ९ किलोमीटरचा पामबीच मार्ग सिडकोने २००० साली बांधला.

गंजलेले खांब कोसळण्याच्या बेतात

नवी मुंबईतील महत्त्वाचे आकर्षणस्थळ असलेल्या पामबीच मार्गावरील पथदिव्यांचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. हा मार्ग सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यापासून महापालिकेने पथदिवे बदललेले नाहीत. या मार्गावरील पथदिवे मोठय़ा प्रमाणात गंजलेले आहेत. त्यामुळे ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा असलेल्या या मार्गावर अचानक एखाद्या पथदिव्याचा खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.

बेलापूर ते वाशी हा ९ किलोमीटरचा पामबीच मार्ग सिडकोने २००० साली बांधला. त्यानंतर हा मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. कालांतराने या मार्गाच्या रचनेत काही तांत्रिक त्रुटी राहील्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तो महापालिका सभांमध्ये व नागरिकांमध्ये नेहमीच चर्चेत राहिला. नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय याच मार्गालगत किल्ले गावठाण चौकाजवळ आकारास आले. याच मार्गावरून हजारो वाहनचालक मुंबईला जातात. शीव-पनवेल महामार्गावर तुर्भे, सानपाडा, नेरुळ, नेरुळ खिंड येथे सातत्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी बेलापूरहून पामबीचमार्गे वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. उरण, उलवे या नोडमधील वाहनचालकही याच मार्गाने मुंबईकडे जातात. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पनवेल, बेलापूर, खारघर, सीवूड्स नेरुळ, सानपाडा विभागातील वाहनचालक पामबीच मार्गानेच पुढे कोपरीवरून ठाण्याकडे जातात. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते.

नवी मुंबईत सुमारे ३० हजार पथदिवे आहेत. त्यातील ४३० पथदिवे पामबीच मार्गावर आहेत. परंतु जुने माईल्ड स्टीलचे हे पथदिवे असून त्यांची दुरवस्था आहे. ते गंजले आहेत. खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने योग्य खबरदारी घेऊन तात्काळ पथदिवे बदलण्याची गरज आहे. या मार्गावरील काही पथदिव्यांनी आधीच मान टाकली आहे. काही वेळेला पथदिवे पडून अपघातही झाले आहेत. पथदिव्यांचे सुमारे २० खांब गंजून पडले आहेत. पडलेल्या खांबांचा वरचा भाग पालिकेच्या विद्युत विभागाने उचलून नेला आहे. उर्वरित तीन-चार फुटांचा भाग तसाच जमिनीलगत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता या मार्गावरील पथदिवे तात्काळ बदलावेत, अशी मागणी होत आहे. पामबीच परिसरात दमट हवेमुळे पोल गंजण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खांब बदलावेत, अशी मागणी होत आहे.

डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेसाठी शीव-पनवेल महामार्गाचे सुभोभीकरण करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण मैदानावर १ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. पथदिव्यांमुळे धोकादायक बनलेल्या पामबीच कडे दुर्लक्ष करणार का, असा प्रश्न आहे

पामबीच मार्ग हा शहरातील महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरील सुरक्षेबाबत पालिका खबरदारी घेत आहे. गंजलेले तसेच खराब झालेले पथदिव्यांचे खांब बदलण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

 – मोहन डगावकर, शहर अभियंता

मोडकळीस आलेल्या खांबांवर एलईडी?

पामबीच मार्गावर सध्या सोडियम व्हेपरचे दिवे आहेत. ते  काढून १४ हजार एलईडी दिवे लावण्याची निविदा प्रक्रिया पालिकेने  राबवली आहे. परंतु ज्या खांबांवर एलईडी लावून पामबीचवर रोषणाईचा झगमगाट करणार ते पथदिवेच गंजलेले आहेत. त्यामुळे गंजलेल्या पथदिव्यांवर एलईडीचा कळस कसा उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम  पामबीच मार्गावरील गंजलेले खांब बदलावेत, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे.

समीर बागवान, परिवहन सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:08 am

Web Title: dangerous street lamp issue navi mumbai
Next Stories
1 वाहनतळाचे बंधन छोटय़ा घरांसाठी त्रासदायक
2 बेकायदा धार्मिक स्थळांवर हातोडा
3 उद्योगविश्व : आधुनिक धोबीघाट
Just Now!
X