झेंडूचे दर स्थिर शेवंती,अष्टगंधा फुलांच्या किमतींत वाढ

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सणानिमित्त झेंडू, शेवंती, अष्टगंधा व आपटय़ाची पाने यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. झेंडूची दर स्थिर असले तरी शेवंती, अष्टरच्या फुलांच्या किमितींत भरघोस वाढ झालेली आहे.

गणेशोत्सवानंतर दसरा- दिवाळीमध्ये या फुलांना अधिक मागणी असते. सोमवारी दसरा असल्याने नवी मुंबईतील बाजारपेठ अक्षरश: फुलून गेली होत्या. शहरातील शिवाजी चौक वाशी, तुर्भे मार्ग, कोपरखैरणे, नेरूळ, सीबीडी, ऐरोली, घणसोली आदी ठिकाणी फुले विक्रीसाठी आली होती. दसऱ्याला सर्वात जास्त झेंडूच्या फुलांना मागणी असते. त्याचबरोबर शेवंती, गुलछडी, अष्टगंधा या फुलांना ही मागणी असते. सध्या यंदा झेंडूचे दर प्रतिकिलो १०० रुपयांवर स्थिर असून शेवंती, अष्टरच्या फुलांच्या किमितींत मात्र भरघोस दरवाढ झालेली आहे. अवकाळी व सततच्या पावसाने या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून या फुलांची आवक रोडावल्याने दर वधारले आहेत.

वाशीतील शिवाजी चौक, कोपरखैरणे से.१५ या ठिकाणी फुलांचा बाजार भरला आहे. गणेशोत्सव ही झेंडूची फुले १०० रुपयांवर उपलब्ध होती, आता हे दर स्थिर आहेत. पंरतु या आधी २००-२५० रुपयांनी उपलब्ध असलेली शेवंती, अष्टगंधा मात्र आता ३००-४०० रुपयांवर पोहचली आहेत. यावेळी ही दोन फुले महागली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दसऱ्यामध्ये पाना फुलांच्या तोरणा करिता झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो, परंतु दसऱ्यामध्ये घरातील वाहने, नवीन वाहने, देवाचे हार या याकरीता या फुलांचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे झेंडूच्या फुलांबरोबर या फुलांना तितकीच मागणी असते. आपटय़ाच्या पानाची एक जुडी दहा रुपये तर आंबाच्या पानांचे तोरण वीस रुपये मीटर दराने उपलब्ध आहे. दरम्यान, सोमवारी सोने प्रतितोळा ३७,५००रु आहे. ही किंमर्त सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे सराफा व्यापारी प्रकाश बोलिया यांनी सांगितले.

झेंडूचे दर स्थिर आहेत. मात्र, शेंवती व अष्टरच्या फुलांच्या किमती वाढल्या आहेत. २००-२५० रुपयांवर उपलब्ध अलसलेली फुले यंदा ३००-४०० रुपयांवर पोहचली आहेत.

– विनोद चोरगे, फुले विक्रेता