18 February 2019

News Flash

दत्तगुरू सोसायटी अंधारात

दत्तगुरू सोसायटीत एकूण १३६ घरे आहेत. सध्या इमारतीत ११५ कुटुंब राहात आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर सहा येथील अतिधोकादायक स्थितीत असलेल्या दत्तगुरू सोसायटीतील रहिवासी आधीच जीव मुठीत धरून जगत असताना आता त्यांच्या त्रासांत आणखी भर पडली आहे. सोमवारी सकाळपासून या इमारतीची वीज खंडित करण्यात आली आहे. शहरात ५८ अतिधोकादायक इमारती असताना आमच्याच सोसायटीचा वीजपुरवठा का खंडित केला, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

दत्तगुरू सोसायटीत एकूण १३६ घरे आहेत. सध्या इमारतीत ११५ कुटुंब राहात आहेत. हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातले हे रहिवासी आहेत. इमारती बांधताना दोन इमारतींचे क्षेत्रफळ २,३६० चौ.मी. असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ११८० चौरस मीटरच क्षेत्रफळ देण्यात आले आहे. दोन इमारतींचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ २३६० आवश्यक असताना हे क्षेत्रफळ सिडकोकडे १,९६६ एवढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे नियमानुसार हक्काचे असलेल ३९४ मीटर क्षेत्रफळ कंडोमिनियम भूखंडाच्या स्वरूपात देण्याची मागणी रहिवासी सिडकोकडे वर्षांनुवर्षे करत होते. परंतु ती फाईल एका टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर जात आहे. इमारत धोकादायक स्थितीत असून भर पावसात रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अतिरिक्त भूखंडाचा प्रश्न अद्यापही रेंगाळतच पडला आहे.

सिडको, पालिकेच्या नियमावलीत रहिवासी भरडले जात आहेत. याच इमारतीच्या पुनर्विकासासाठी सिडकोने पालिकेला दिलेल्या पत्रानुसार पालिकेने तेथील अनधिकृत भाजी मंडई तोडली आहे. तरी सिडकोकडून चालढकल सुरू आहे.  आमचीच वीज का खंडित केली? आम्हाला पर्यायी घरे द्या, अशी मागणी रहिवासी मोहन इंदलकर यांनी केली.

आम्हाला राहू देत नाहीत आणि मागण्याही पूर्ण करत नाहीत. उलट आमचाच वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत पालिका आयुक्त, महावितरण, महापौर सर्वाची भेट घेतली आहे. परंतु परिणाम झालेला नाही.

-राजेंद्र बागल, अध्यक्ष, दत्तगुरू सोसायटी

दत्तगुरू सोसायटीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आणाला. भाजी मंडईची जागा रिकामी केली. सर्वच अतिधेकादायक इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.

– डॉ. रामास्वामी एन, पालिका आयुक्त

First Published on August 1, 2018 2:43 am

Web Title: dattaguru society building electricity discontinued