ना पुरेसे वैद्यकीय साहित्य ना मनुष्यबळ..अशा स्थितीत करोनाचे संकट असताना तिच्यावर पनवेलच्या आरोग्यसेवेची जबाबदारी देण्यात आली. तीही सुट्टी न घेता विश्रामगृहात वास्तव्य करीत अहोरात्र काम करीत आहे, त्या परिस्थितीत करोनारुग्णांची सेवा केली. ‘ती’च्या कर्तृत्वाची दखल घेत शासनाने नुकताच राज्यपालांच्या हस्ते तिचा गौरव केला.

डॉक्टर अरुणा पोहरे (वय ३४) असे त्या सेवाव्रती महिला डॉक्टरचे नाव आहे. करोनाकाळात अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. यात कोकण विभागातून पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर अरुणा पोहरे यांचाही समावेश आहे.

डॉक्टर पोहरे या मूळच्या नांदेडच्या. आठ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्या एमडी फिजिशियन झाल्या. त्या माणगाव येथे वैद्यकीय सेवेत होत्या. मे महिन्यात पनवेलमधील करोनाची स्थिती गंभीर असताना २० मे रोजी त्यांची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  डॉ. पोहरे यांची तातडीने बदली पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात केली. पनवेलमधील हे एकमेव शासकीय करोना रुग्णालय. पनवेल शहरासह, पनवेल ग्रामीण व  उरणमधील करोना रुग्णांवरही या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील आरोग्यसुविधा या अपुऱ्या होत्या. रुग्णालयाची इमारत फक्त नवीन होती, मात्र ना पुरेसे वैद्यकीय साहित्य ना पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ. परिसरातील खासगी डॉक्टरांना नेमूनही येथे डॉक्टर आरोग्यसेवेसाठी येण्यास तयार नव्हते.  अशा परिस्थितील वाढत्या करोनारुग्णांना आरोग्यसेवा पुरविणे हे कठीण काम होते. यात त्यांना पनवेलमध्ये राहण्यासाठी घरही नव्हते. मग येथील शासकीय विश्रामगृहातच मुक्काम घेत डॉ. पोहरे यांनी दिवसभर १४ ते १६ तास सलग कर्तव्य बजावले. रात्री तातडीच्या प्रसंगीही त्यांनी रुग्णसेवा दिली.

मागील पाच महिन्यांपासून त्यांनी ही रुग्णसेवा केली. राज्यपालांनी करोनाकाळात प्रत्यक्षात काम केलेल्या डॉक्टरांची यादी आरोग्य विभागाकडे मागविल्यावर कोकण विभागातर्फे आरोग्य विभागाने एकमेव डॉ. पोहरे यांचे नाव सूचविले.

सन्मानावेळी डॉ. पोहरे यांना त्यांची आई व भावाची आठवण आली. स्वत:च्या कुटुंबापासून वेगळे राहून ही वैद्यकीय सेवा बजावल्याने पनवेलमध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २४०० करोनाग्रस्तांवरील उपचार झाले असून त्यापैकी ९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पाच हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाली आहे.

राजभवनात राज्यपालांच्या हस्ते करोना योद्धा म्हणून सन्मान झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. आज माझे बाबा असते तर त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असता. त्यांना खूप अभिमान वाटला असता. या सत्कारामुळे यापुढे मला गरीब व गरजू रुग्णांची आरोग्यसेवा करण्याची उमेद व स्फूर्ती मिळाली.

-डॉ. अरुणा पोहरे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय,