सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर हैदराबादच्या रचिताचा मृतदेह आढळला

पनवेल शहरापासून सुमारे १३ किलोमीटरवर असलेल्या माची प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी एकटय़ाच आलेल्या रचिता गुप्ता कनोडिया (२७) हिचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. हैदराबाद येथे राहणारी रचिता ही २५ नोव्हेंबरला मुंबईला आली होती. पनवेलच्या ‘निसर्ग मित्र संस्थे’च्या कार्यकर्त्यांनी आणि गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासींनी रचिताला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह सापडला.

गृहिणी असणारी रचिता ही यापूर्वी दोन ठिकाणी ट्रेकसाठी गेली होती. सप्टेंबर महिन्यात ती आपल्या सहकाऱ्यांसह याच गडावर आली होती. २५ नोव्हेंबरला घरातून ट्रेकिंगला जाताना तिने आपल्यासोबत अन्य सहकारीही असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. प्रत्यक्षात तिच्यासोबत कोणीही नव्हते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. २९ नोव्हेंबपर्यंत रचिता घरी न परतल्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने हैदराबाद येथे केली होती. त्यानंतर रचिताचा तपास सुरू झाला.

मुंबई विमानतळावरील रचिताचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. त्यानंतर विमानतळानजीकच्या टॅक्सीचालकाचा शोध पोलिसांनी कसून शोध घेतला. त्याने रचिताला २५ नोव्हेंबरला पनवेल येथील माची प्रबळगडाच्या पायथ्याशी सोडल्याचे सांगितले.  त्यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याने तिचा शोध सुरू केला. १ डिसेंबरपासून रचिताची शोधमोहीम सुरूझाली. अखेर ६ डिसेंबरला तिचा मृतदेह दरीत आढळला.

दगडावरून तोल जाऊन मृत्यू?

गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासींनी, पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेचे सुरेश रिसबूड आणि अन्य कार्यकर्ते, रिती पटेल हे ट्रेकर आदींनी रचिताला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकीकडे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे २० जणांचे पथक रचिताला शोधत होते. तर याच झाडाझुडपांनी वेढलेल्या उंच डोंगररांगांमध्ये आणि खोल दरीत आदिवासी मुले व निसर्ग संस्थेचे कार्यकर्ते रचिताचा शोध घेत होते. निसर्गमित्र संस्थेने पाच-पाच जणांचे वेगवेगळे गट करून रचिताचा शोध सुरू केला होता. प्रबळगड आणि माथेरान या दोन भल्या मोठय़ा डोंगरांच्या मधोमध कलावंतीण डोंगराजवळच्या दरीत रचिताचा मृतदेह सापडला. डोक्याला जबर मार लागलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या शोधमोहिमेमध्ये निसर्गमित्र संस्थेच्या मदतनीसांकडे रोप, स्ट्रेचर, रॅपिलिंगसाठीचे साहित्य, निलगिरीच्या बाटल्या, पाणी, हेल्मेट, मास्क इत्यादी साहित्यही होते. अखेर ६ डिसेंबरला रचिताचा मृतदेह दरीत सापडला. प्रबळगड सर केल्यावर तेथून माथेरानचा विस्तृत भूभाग दिसतो. तिथेच उंच डोंगरावर एका मोठय़ा दगडाला तडा गेल्याचे दिसले. याच दगडावरून तोल जाऊन रचिता पडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.