पनवेल : तालुक्यातील हरिग्राम केवाळे गावानजीक सोमवारी सायंकाळी बॅगमध्ये मृतदेह सापडला आहे. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाला नदीपात्रात एका बेवारस बॅगमधून हाताचा काही भाग दिसला त्यानंतर या बॅगेत मृतदेह असल्याचे उघडकीस आले. संबंधित मृतदेह हा ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा असल्याचे वैद्यकीय अहवालातून उजेडात आले आहे. संबंधित मृतदेहाची ओळख पटली नसून पनवेल तालुका पोलीस याबाबत अधिक शोध घेत आहेत.

सोमवारी हरिग्राम केवाळे गावात सापडलेला मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. ज्या तरुणाला पहिल्यांदा ही बॅग दिसली त्यानंतर त्याने गावच्या पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळविला असून या मृतदेहाच्या मानेचे हाड तुटल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधिताचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. तो २५ दिवसांपूर्वीच या बॅगमध्ये ठेवला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी मृतदेहाच्या वर्णनाशी साधर्म्य असणाऱ्या बेपत्ता तरुणांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. ठाणे, रायगड, मुंबई व नवी मुंबई येथील सर्व पोलीस ठाण्यांमधून याची माहिती एकत्रित करण्याचे काम तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.