सीवूड्समध्ये विजेचा धक्का लागून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता कुशाल गुंजाळ यांना बडतर्फ करण्यात आले. १७ एप्रिल रोजी सेक्टर ४० येथे कॅनरा बँकेच्या बाजूला व शहरातील ग्रँड सेंट्रल मॉलच्या समोरच असलेल्या पदपथावरील उघडय़ा विद्युत डीपीतून मुलीला विजेचा धक्का बसला होता.

सीवूड्समधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर वाढलेल्या झोपडपट्टीतील राहणाऱ्या लहान मुलीचा डीपीला हात लागल्याने तिचा मृत्यू झाला होता. तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. एनआरआय पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबईत उघडय़ा डीपीमुळे तुर्भे, घणसोली परिसरात शॉक लागून मृत्यू ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी ऐरोली तलावाजवळील हायमास्टचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही संबंधित अभियंत्यावर कारवाई झाली नव्हती. तुर्भे येथे एका घोडय़ालाही शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता.

पालिका व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात व मूळ गावठाणात भूमिगत वीजवाहिन्यांचे कोटय़वधी रुपयांचे काम केलेले आहे. तरीही अनेक गावठाणांत डीपीतून बाहेर आलेल्या वायर रस्त्यावर पडलेल्या असतात. मुलीच्या मृत्यू प्रकरणी अद्याप इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरचा अहवाल येणे बाकी आहे.

सीवूड्समधील मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशानुसार करारपद्धतीवरील कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्यात आली. त्यांला सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.   – दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ