सीवूड्स विभागातील सेक्टर-४० येथे कॅनरा बँकेनजीक ग्रँड सेंट्रल मॉलच्या समोरील पदपथावरील ‘डीपी’तील वीजतारांना स्पर्श होऊन मुलीचा मृत्यू झाला. शाहिणी कंपेश भोसले (वय पाच वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

मॉलसमोरील पदपथावर विद्युत डीपी आहे. त्यातील काही तारा पदपथावर उघडय़ावर पडलेल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास नजीकच्या झोपडपट्टीत राहणारी शाहिणी हिचा त्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने तिचा मृत्यू झाला. तिला तातडीने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एनआरआय पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

अनेक विभागांत असलेल्या पदपथावरील डीपी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न या घटनेने निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच पोलिसांनीसुद्धा मुलीच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नवी मुंबई पालिकेच्या परिवहन विभागाचे सदस्य समीर बागवान यांनी केली आहे. तर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी केली आहे.