शेखर हंप्रस

शीव-पनवेल महामार्गावरील विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही शासकीय यंत्रणा कामाला लागल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा विद्युत विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. या दुर्घटनेनंतर या खांबाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात आली तर नाही, पण हा खांब कुणाच्या अखत्यारित येतो याचा शोध घेण्यातच विलंब लावला.

नवी मुंबईत उघडय़ा वायरला स्पर्श झाल्याने आतापर्यंत किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यात अद्याप दोषी कोण हेच समोर आले नाही. हीच मालिका पुढे चालत रविवारी रात्र एकच्या सुमारास शीव-पनवेल महामार्गावर सुरेश जनघरे यांचा मृत्यू झाला. सानपाडा रेल्वे स्थानकासमोर महामार्गावर असलेल्या बसथांब्यानजीक विजेच्या खांबाचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पाहणी करताना खांबाच्या खाली पडलेल्या खड्डय़ात एक वायर उघडी पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आहे. यानंतर सरकारी उदासीनता कशी असते याचा नमुना समोर येत आहे.

मान्सूनपूर्व कामे करूनही हा प्रकार घडल्याने पोलीस तत्काळ संबंधित विभागावर कारवाई करू शकत होते. मात्र तीन दिवस खांब महापालिकेचा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचा हे शोधण्यातच गेले. शेवटी हा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे हे समोर आल्यावरही कारवाई न करता त्यांना पत्र दिले. हे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या विद्युत विभागाकडे सुपूर्द केले. पत्रात नेमके काय लिहिले हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र पोलीस म्हणतात तपास सुरू आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक भाग असलेल्या विद्युत विभागाने त्यावर कळस चढवत दुरुस्ती सोडाच उलट या खांबावरचा वीजपुरवठाच खंडित केला.

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकलेही नाहीत. एका विजेच्या खांबाचा वीजपुरवठा बंद केल्यानंतर १० खांबांचा वीजपुरवठा बंद होतो, हे माहीत असूनही कोणताही सारासार विचार न करता या खांबावरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

या विद्युत खांबावरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. लवकरच त्याची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. घटनेबाबत पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे.

– एस. एस. कोळी, विद्युत अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग